दिवाळीत मोठ्या पडद्यावर रंगणार ‘ईठा’ आणि ‘रामायण’चा अनोखा संगम!
यंदाच्या दिवाळी प्रेक्षकांसाठी खास सिनेमॅटिक मेजवानी असून श्रद्धा कपूरची भूमिका असलेला ‘ईठा’चा ट्रेलर ‘रामायण’सोबत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे.
Eetha & Ramayan Movie : यंदाच्या दिवाळी प्रेक्षकांसाठी खास सिनेमॅटिक मेजवानी असणार आहे. श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ईठा’ या चित्रपटाचा ट्रेलर ‘रामायण’सोबत (Eetha & Ramayan Movie) चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. म्हणजेच, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी नातं सांगणाऱ्या दोन असामान्य कथा यंदाच्या सणासुदीच्या काळात एकाच वेळी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
एका बाजूला आहे पिढ्यान् पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा देणारी अजरामर महागाथा ‘रामायण’, तर दुसऱ्या बाजूला आहे ‘ईठा’चा प्रेरणादायी प्रवास! अनेक संकटांवर आणि अडथळ्यांवर मात करत स्वतःच्या कलेच्या जोरावर एक दिग्गज कलाकार म्हणून नाव कमावणाऱ्या ईठाची ही कहाणी आहे.
या फेस्टिव्ह सीझनमध्ये या दोन कथांचा एकत्रित अनुभव म्हणजे सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाची जणू डबल ट्रीटच! एकीकडे भारतीय पौराणिक परंपरेचा गौरव, तर दुसरीकडे भारतीय कलेचा, संघर्षाचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास. अशा अनोख्या अंदाजात दोन्ही कथा भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरेचा सन्मान करणार आहेत. ‘ईठा’ 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.