भारतीय टँकरांना होर्मुज मार्ग खुला केल्याचा दावा खोटा; इराणचा खुलासा, इस्रायलविरोधी अट घातल्याची माहिती
भारतीय टँकरांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता इराणने त्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.
Claim that the Strait of Hormuz has been opened to Indian tankers is false : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या समुद्री मार्ग असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मूझबाबत एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय टँकरांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता इराणने त्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.
इराणने भारतीय टँकरांना परवानगी दिल्याचे वृत्त फेटाळले
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रायटर्सने इराणी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या ध्वजाखाली चालणाऱ्या तेलवाहू जहाजांना होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्याची कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. याआधी भारतीय सूत्रांनी असा दावा केला होता की भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारताच्या ध्वजावरील टॅंकरांना होर्मूझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
या चर्चेचा मुख्य उद्देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या या समुद्री मार्गावरील वाहतूक सुरू ठेवणे हा होता. मात्र तेहरानने हा दावा पूर्णपणे नाकारला आहे. सध्या फक्त चीनच्या तेलवाहू जहाजांनाच होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जात असल्याचे देखील सांगितले जात आहे. इराण चीनला मोठ्या प्रमाणात तेल विक्री करून आर्थिक फायदा मिळवत असल्याची देखील चर्चा आहे.
इराणची अट – इस्रायलच्या राजदूतांवर कारवाई
इराणने यासंदर्भात एक अट देखील घातली आहे. ज्या देशांनी आपल्या देशातून इस्त्राईलच्या राजदूतांना बाहेर काढले, त्यांनाच होर्मूझ सामुद्रधुनीतून जहाजे पाठवण्याची परवानगी दिली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे. या ताज्या भूमिकेवर भारत सरकारकडून अद्याप अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याआधी भारतीय सूत्रांनी असा दावा केला होता की पुष्पक आणि परिमल हे भारतीय टँकर होर्मूझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पुढे जात आहेत. मात्र अमेरिकन युरोपीय आणि इस्त्रायली जहाजांना या महत्वाच्या जलमार्गावर निर्बंधांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
भारत आणि इराणच्या नेत्यांमध्ये पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा झाली होती. या चर्चेत होर्मूझ समुद्रधुनीतील समुद्री वाहतूक हा महत्वाचा मुद्दा होता. युद्ध सुरू झाल्यानंतर डोही देशांच्या नेत्यांमधील ही तिसरी चर्चा होती.
युद्ध आखातात अन् गॅस टंचाई भारतात; सर्वसामान्यांच्या घरात पहिल्यांदा कसा अन् कधी पोहचला LPG
सौदीचे तेल घेऊन मुंबईत पोहोचला टँकर
दरम्यान सौदी अरेबिया येथून कच्चे तेल घेऊन निघालेला एक टँकर सुरक्षितपणे होर्मूझ सामुद्रधुनी पार करून मुंबई पोर्ट येथे दाखल झाला आहे. शेनलॉंग स्वेजमॅक्स नावाचा हा टँकर लाइबेरियाच्या ध्वजाखाली नोंदणीकृत असून त्याचा कप्तान भारतीय होता. लॉयडज लिस्ट इंटेलिजन्स आणि टँकर ट्रॅकर्स डॉट कॉम यांच्या समुद्री ट्रॅकींग डेटानुसार, हा टँकर 1 मार्च रोजी रास तनुरा या सौदी बंदरातून कच्चे तेल घेऊन निघाला होता आणि दोन दिवसांनी प्रवासाला सुरूवात केली होती. 8 मार्च रोजी या जहाजाची नोंद होर्मूझ समुद्रधुनीच्या आत करण्यात आली होती.
या जहाजाने सुरक्षितपणे प्रवास पूर्ण केल्यामुळे भारतातील ऊर्जा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायू आयातीपैकी निम्म्याहून अधिक पुरवठा या अरुंद समुद्री मार्गातूनच होतो.
भारतीय जहाजे अजूनही परिसरात
काही जहाजांनी सुरक्षितपणे मार्ग पार केला असला तरी अनेक भारतीय जहाजे अजून देखील या संवेदनशील समुद्री मार्गात किंवा त्याच्या आसपास आहेत. डायरेक्त्तरेट जनरल ऑफ शिपिंगच्या माहितीनुसार, या परिसरात तणाव सुरू झाल्यापासून किमान 28भारतीय ध्वजावरील जहाजे होर्मूझ समुद्रधुनीत किंवा त्याच्या आसपास कार्यरत होती. यापैकी आठ जहाजे, जी संघर्ष सुरू होताना समुद्रधुनीच्या पूर्व भागात होती, ती आता सुरक्षित पाण्यात पोहोचली आहेत.
देश महिमा, देश अभिमान, स्वर्ण कमल, विश्व प्रेरणा, जग विराट, जग लोकेश आणि एलएनजीसी असीम ही जहाजे होरमीझ सामुद्रधुनी पार करून आता अरब सागरात पोहोचली आहेत. तर जग लक्ष हे जहाज अंगोलाच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान, पश्चिम आशियातील तणाव अजूनही कायम असून या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर जागतिक पातळीवर लक्ष ठेवले जात आहे.
