युद्ध आखातात अन् गॅस टंचाई भारतात; सर्वसामान्यांच्या घरात पहिल्यांदा कसा अन् कधी पोहचला LPG

LPG Shortage इराण-अमेरिका युद्धाची धग आणि दुसरीकडे भारतीय शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा!

  • Written By: Published:
आखातातील युद्धामुळे भारतात गॅस टंचाई; सर्वसामान्यांच्या घरात पहिल्यांदा कसा अन् कधी पोहचला LPG

LPG History In India : एकीकडे इराण-अमेरिका युद्धाची धग आणि दुसरीकडे भारतीय शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा! हे चित्र बघता देशात एलपीजीचं संकट गडद होताना दिसतंय. पण मित्रांनो, ज्या गॅसशिवाय आज आपलं पानही हलत नाही, तो आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला कसा? प्रोपेन आणि ब्युटेनचं हे मिश्रण भारताच्या कानाकोपऱ्यात कसं पोहोचलं? आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत एलपीजीचा 7 दशकांचा कधीच न ऐकलेला रंजक इतिहास!

LPG टंचाईवर जालीम उपाय! गॅसशिवाय 5 मिनिटांत बनणारे पोटभरीचे ‘फायरलेस’ फूड…

एलपीजीची कहाणी सुरू होते ती 1956 मध्ये, जेव्हा भारत सरकारने ONGC ची स्थापना केली. बॉम्बे हाय, आसामचं डिगबोई आणि कृष्णा-गोदावरीमधून जेव्हा कच्चं तेल आणि नैसर्गिक गॅस काढणं सुरू झालं, तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताच्या ऊर्जेचं चित्र बदलू लागलं. एलपीजी हा काही स्वतंत्र वायू नाही, तर तो क्रूड ऑईल रिफायनिंगच्या प्रक्रियेत तयार होणारा एक महत्त्वाचा ‘बाय-प्रोडक्ट’ आहे.

1955 साली ‘बर्मा शेल’ जी आजची भारत पेट्रोलियम आहे या कंपनीने ‘बुर्शाने’ या ब्रँडने पहिल्यांदा एलपीजी लाँच केला. पण खरी क्रांती घडवली ती इंडियन ऑईलच्या ‘इंडेन’ने! 22 ऑक्टोबर 1965 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला, कारण याच दिवशी कोलकात्यात देशातील पहिलं इंडेन कनेक्शन दिलं गेलं. फक्त 2 हजार ग्राहकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 18 कोटी कनेक्शनपर्यंत पोहोचला आहे.
LPG ने केवळ स्वयंपाक सोपा केला नाही, तर महिलांच्या आयुष्यातही क्रांती आणली. पूर्वी लाकूड, कोळसा आणि रॉकेलमुळे होणाऱ्या धुराने महिलांना श्वसनाचे आणि डोळ्यांचे गंभीर आजार होत. पण 2016 मध्ये आलेल्या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने’ गावोगावी गॅस पोहोचवून हा धूर कायमचा संपवला आणि एक नवा इतिहास रचला.

Iran-USA War : युद्ध आणि शेअर बाजार : रणांगणावरील गोळीबारात बाजार पडतो की सावरतो?

भारतात आज आसाममधील सर्वात जुने तेल क्षेत्र डिगबोई, नाहरकटिया आणि गुजरातचं अंकलेश्वर ही प्रमुख तेल क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एवढेच नाही, तर भारताने विशाखापट्टनम, मंगळुरू आणि पुदुर येथे आपत्कालीन कच्च्या तेलाचे मोठे साठे (Strategic Reserves) तयार केले आहेत, जे संकट काळात आपल्याला आधार देतात.

पण इथे एक मोठी मेख आहे! देशात उत्पादन होत असूनही आपली 6% गरज अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. यातला 70 % गॅस आपण सौदी अरब, कतर आणि युएई (UAE) कडून घेतो, तर उर्वरित 30% अमेरिका आणि नायजेरिया कडून येतो. म्हणूनच, जेव्हा मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडते, तेव्हा तिथून येणारा गॅसचा पुरवठा विस्कळीत होतो आणि त्याचा थेट चटका आपल्या खिशाला आणि किचनला बसतो!

follow us