स्विगीवरून आता LPG मागवता येणार; काही मिनिटांत होणार होम डिलिव्हरी, करार झाला

LPG किराणा, दूध किंवा भाजीपाला जसा काही मिनिटांत घरी पोहोचतो, तसाच LPG गॅस सिलेंडरही Swiggy Instamart वरून ऑन-डिमांड ऑर्डर करता येणार

  • Written By: Published:
Swiggy Instamart HPCL Partnership

Swiggy Instamart-HPCL Tie-up : घरातील गॅस सिलेंडर अचानक संपला आणि स्वयंपाक अर्धवट राहिला, तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण लवकरच किराणा, दूध किंवा भाजीपाला जसा काही मिनिटांत घरी पोहोचतो, तसाच LPG गॅस सिलेंडरही Swiggy Instamart वरून ऑन-डिमांड ऑर्डर करता येणार आहे. देशात प्रथमच अशी सेवा सुरू होत असून, तिची सुरुवात बेंगळुरूमधून केली जाणार आहे. क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म Swiggy Instamart ने सरकारी तेल कंपनी HPCL सोबत भागीदारी करत ही नवी सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

काय असेल विशेष?

या सेवेअंतर्गत ग्राहकांना Swiggy Instamart अॅपवरून काही मिनिटांत LPG सिलेंडर ऑर्डर करता येईल. सुरुवातीला 10 किलोचा नवीन ‘HP Navya’ कंपोझिट LPG सिलेंडर आणि 5 किलोचा ‘छोटू’ LPG सिलेंडर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

‘HP Navya’ सिलेंडरची खास वैशिष्ट्ये

HPCL ने सादर केलेला HP Navya हा पारंपरिक स्टील सिलेंडरपेक्षा हलका, गंजरोधक आणि अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. या सिलेंडरची बॉडी अंशतः पारदर्शक असल्यामुळे आत किती गॅस शिल्लक आहे, हेही सहज पाहता येते. लहान कुटुंबे, विद्यार्थी, अपार्टमेंटमध्ये राहणारे आणि सेकंडरी सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी हा सिलेंडर उपयुक्त ठरणार आहे.

LPG कनेक्शन नसले तरी चालेल

या सेवेतील आणखी एक मोठा फायदा म्हणजे सिलेंडर मागवण्यासाठी आधीपासून LPG कनेक्शन असणे आवश्यक नाही. नवीन ग्राहकही Instamart अॅपद्वारे थेट सिलेंडर बुक करू शकतील. मात्र, पहिल्या ऑर्डरवेळी ओळखपत्र पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतरच्या ऑर्डर रिफिल म्हणून मानल्या जातील आणि डिलिव्हरीवेळी रिकामा सिलेंडर परत घेतला जाईल.

कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

– विद्यार्थी
– नोकरीसाठी शहरात राहणारे तरुण
– लहान कुटुंबे
– भाड्याच्या घरात राहणारे नागरिक
– अतिरिक्त (Secondary) LPG सिलेंडरची गरज असलेले ग्राहक

सुरुवात बेंगळुरूत, पुढे इतर शहरांमध्येही विस्तार

सध्या ही सुविधा बेंगळुरूमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यानंतर देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा कंपन्यांचा मानस आहे. मात्र, विस्ताराची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सुरक्षेला प्राधान्य

इन्स्टामार्टने आता केवळ किराणा सामानापुरते मर्यादित न राहता लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवले आहे. HPCL सोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही ही सोय थेट आवश्यक घरगुती सेवेपर्यंत वाढवत आहोत. ग्राहकांचा विश्वास आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन आम्ही एलपीजी सिलिंडर थेट इन्स्टामार्टवर आणल्याचे Instamart चे CEO अमितेश झा यांनी सांगितले.

तर, ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी HPCL नवनवीन तंत्रज्ञान आणण्यास कटिबद्ध आहे. इन्स्टामार्टच्या वेगवान आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आमचा ‘HP Navya कॉम्पोझिट सिलिंडर’ ग्राहकांपर्यंत अधिक सहजतेने पोहोचेल. ‘नव्या भारता’साठी एलपीजी सेवा अधिक सुलभ करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे HPCL चे संचालक (मार्केटिंग) अमित गर्ग यांनी सांगितले.

घरपोच सेवेत आणखी एक मोठी भर

क्विक-कॉमर्समुळे आधीच किराणा, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू काही मिनिटांत उपलब्ध होत आहेत. आता त्यात LPG सिलेंडरचीही भर पडत असल्याने, गॅस संपल्यावर वाट पाहण्याची गरज उरणार नाही. विशेषतः शहरी भागातील ग्राहकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरण्याची शक्यता आहे.

follow us