अंगावर पांघरूण घेतल्याने झोप खरोखरच सुधारते की बिघडते?; उत्तर सापडलं…
Psychology Of Blanket अनेकांना अंगावर पांघरूण घेतल्याशिवाय झोप येत नाही. तर, काही जणं डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला गुंडाळून घेतात...
Psychology Of People Those Sleeping With Blanket In Night : रात्री झोपताना खोलीत एसी सुरू आहे, पंखाही वेगाने फिरतोय आणि वातावरणात चांगलाच गारवाही आहे. तरीही अनेकांना अंगावर पांघरूण घेतल्याशिवाय झोप काही येत नाही. एवढचं काय तर, काही जणं डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला पांघरुणात गुंडाळून घेतात, तर काहींना केवळ पायावर किंवा पोटावर चादरीचा एक कोपरा घेतला तरी, झोप लागत नाही. विशेष म्हणजे कधी-कधी बाहेर उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असतानादेखील ही सवय काही सुटत नाही. घरातील इतरांना हा प्रकार विचित्र वाटत असला, तरी पांघरूण घेणाऱ्या व्यक्तीसाठी तो झोपेचा अविभाज्य भाग असतो. पण कधी विचार केलाय का? शरीराला थंडी वाजत नसतानाही आपल्याला पांघरूण का हवं असतं? पांघरूण घेतल्यावर मनाला शांत आणि सुरक्षित का वाटतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, पांघरूण घेतल्याने झोप खरचं सुधारते की, बिघडते? त्याबद्दल जाणून घेऊया…
महिलांना पाहताच पक्षी लवकर उडून जातात; पुरुषांना मात्र जवळ येऊ देतात, असं का? वैज्ञानिकही चक्रावले…
पांघरूण अंगावर घेताच मनाला शांत का वाटतं?
पांघरूण अंगावर घेताच मनाला शांत का वाटतं? असा प्रश्न कधी तुमच्याही मनात आला असेल तर, यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूने तयार केलेली सवय होय. मानसशास्त्रात याला ‘Conditioning’ (अनुबंधन) असं संबोधलं जातं. एखादी कृती वारंवार केल्यामुळे मेंदू त्या कृतीचा विशिष्ट अनुभवाशी संबंध जोडतो. उदाहरणार्थ, लहानपणापासून पांघरूण घेऊन झोपण्याची सवय असेल, तर कालांतराने पांघरूण अंगावर घेणं ही झोपण्यापूर्वीची रोजची सवय बनते. त्यामुळे पांघरुणाचा स्पर्श होताच मेंदूला विश्रांतीची वेळ झाल्याचा संकेत मिळतात.
याशिवाय, पांघरुणामुळे शरीराला मिळणाऱ्या स्पर्शाच्या संवेदनांचाही यात वाटा असतो. अंगावर पांघरूण घेतल्यावर त्वचेवर हलका आणि एकसमान दाब निर्माण होतो. काही व्यक्तींना या दाबामुळे एखाद्याने मिठी मारल्यासारखी किंवा सुरक्षित कवचात असल्यासारखी भावना मिळते. याच संकल्पनेला ‘Deep Pressure Stimulation’ असं म्हटलं जातं. शरीरावर पडणारा नियंत्रित दाब काही व्यक्तींना आरामदायी वाटतो. मात्र, प्रत्येक व्यक्तीला पांघरुणामुळे असाच अनुभव येतो असं नाही. काहींसाठी तो मानसिक आरामाचा भाग असतो, तर काहींसाठी ती केवळ झोपण्यापूर्वीची अंगवळणी पडलेली सवय असू शकते.
पांघरुणाचा मानसिक आरोग्याशीही संबंध आहे का?
आता वरील प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर तुमच्या मनात पुढच्या प्रश्नानंदेखील घर केलचं असेल ते म्हणजे, पांघरुणाचा मानसिक आरोग्याशीही संबंध आहे का? तर, पांघरुणामुळे मिळणारा आराम केवळ भावनिक पातळीवर मर्यादित आहे का, की त्याचा झोपेवर आणि चिंतेवरही परिणाम होऊ शकतो? याचा अभ्यास करण्यासाठी स्वीडनमधील संशोधकांनी 2020 मध्ये एक महत्त्वाचं संशोधन केलं होतं. यासंबंधीचा शोधनिबंध ‘Journal of Clinical Sleep Medicine’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशितदेखील झाला होता.
या अभ्यासात निद्रानाशासोबत नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, सामान्य चिंताविकार किंवा एडीएचडी यांपैकी निदान झालेल्या 120 प्रौढ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या सहभागी व्यक्तींना संशोधकांनी दोन गटात विभागले. यातील एका गटाला वजनदार पांघरूण वापरण्यास देण्यात आलं, तर दुसऱ्या गटाला तुलनेने हलकं पांघरूण देण्यात आलं. चार आठवड्यांनंतर दोन्ही गटांना आलेल्या अनुभवांचा अभ्यास करण्यात आला. ज्यात वजनदार पांघरूण वापरणाऱ्या गटातील व्यक्तींच्या निद्रानाशाच्या तीव्रतेत अधिक सुधारणा झाल्याचं आढळून आलं तसेच, थकवा, चिंता आणि नैराश्याशी संबंधित काही लक्षणांमध्येही सकारात्मक बदल झाल्याचे नोंद घेण्यात आली.
या संशोधनामुळे वजनदार पांघरुणांचा झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम जरी समोर आला. मात्र, या अभ्यासातील सहभागी आधीपासूनच निद्रानाश आणि मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते. त्यामुळे वजनदार पांघरूण वापरल्याने प्रत्येक निरोगी व्यक्तीची चिंता कमी होईल किंवा झोप सुधारेल, असे म्हणता येणार नाही.
दिवाळीत 31 टक्के कुटुंबं खरेदीच करणार नाहीत; सर्व्हेक्षणात ग्राहकांनी सांगितला ‘मूड’
पांघरूण घेतल्याने झोप सुधारते की झोपमोड होते?
वरील दोन प्रश्नांनंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा असलेल्या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया ते म्हणजे झोपतांना अंगावर पांंघरूण घेतल्याने खरोखरचं झोप सुधारते की, बिघडते? आतापर्यंत आपण पांघरुणाचा संबंध मेंदूच्या सवयी, स्पर्शाच्या संवेदना आणि मानसिक आरामाशी असल्याचं पाहिलं. पण झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे शरीराचं तापमान. कारण झोप लागण्याच्या प्रक्रियेत शरीराच्या अंतर्गत तापमानात नैसर्गिक बदल होत असतात. त्यामुळे झोपेच्यावेळी शरीराभोवती निर्माण होणारं तापमान किती आरामदायी आहे, यालाही तेवढचं महत्त्व असतं.
याबाबत 2018 मध्ये ‘Journal of Thermal Biology’ या वैज्ञानिक नियतकालिकेत एक संशोधन प्रकाशित झालं होतं. या संशोधनात झोपेच्यावेळी शरीराचं तापमान आणि सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता. आपण झोपताना अंगावर घेतलेलं पांघरूण आणि परिधान केलेले कपडे मिळून शरीराभोवती एक सूक्ष्म वातावरण तयार करतात. यालाच ‘Sleep Microclimate’ असं म्हटलं जातं.
हे सूक्ष्म वातावरण शरीरासाठी अनुकूल असेल, तर झोपेच्या आरामदायी अनुभवाला मदत होऊ शकते. मात्र, पांघरूण खूप जाड असेल किंवा त्यातून शरीराभोवती अतिरिक्त उष्णता निर्माण होतं असेल तर, झोपेत व्यत्यय येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पांघरूण घेतल्याने प्रत्येकवेळी झोप सुधारतेच असं नाही. पांघरुणाचा प्रकार, खोलीतील तापमान आणि व्यक्तीच्या शरीराच्या तापमान या गोष्टींवरदेखील झोप अवलंबून असते.
मग झोपताना पांघरूण घ्यावं की टाळावं?
वरच्या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि ऐकल्यानंतर तुमचं मन नक्कीच कन्फ्युज झालं आहे आणि मनात एक प्रश्न नक्की तयार झाला असेल मग झोपतांना पांघरूण घ्यावं की, टाळावं? तर, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी सारखं असू शकत नाही. कारण, काही व्यक्तींना हलकी चादर पुरेशी असते, तर काहींना थोडं वजनदार पांघरूण अधिक आरामदायी वाटतं. मात्र, पांघरूण घेतल्यानंतर जास्त घाम येत असेल, शरीराला उष्णता जाणवत असेल किंवा रात्री वारंवार जाग येत असेल, तर पांघरुणाचा प्रकार आणि जाडी बदलणं योग्य ठरू शकतं.