महायुतीत वादाची ठिणगी! नवनाथ बनांवर निलेश राणे आक्रमक, शिंदेंनी दिले नेत्यांना महत्त्वाचे आदेश
पुणे पदवीधारच्या वादात शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी उडी घेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Nilesh Rane takes an aggressive stance against Navnath Banar : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या पराभवावरून हा वाद अधिकच चिघळला आहे. आता या वादात शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी उडी घेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागांवर विजय मिळवला, तर महायुतीने शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागा जिंकल्या. त्यामुळे पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्या. या निकालानंतर महायुतीमध्ये राजकीय घमासान सुरू झाले आहे.
पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला अपेक्षित साथ दिली नसल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. शिवसेनेच्या भूमिकेमुळे महायुतीच्या विजयाच्या गणिताला सुरुंग लागल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर शिंदे गटातील नेतेही आक्रमक झाले आणि त्यांनी नवनाथ बन यांच्यावर पलटवार सुरू केला.
शेतकऱ्यांचा अपमान भोवला! संजय गायकवाडांवर एकनाथ शिंदे संतापले, थेट पक्षातून निलंबनाचे आदेश?
या वादात आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी नवनाथ बन यांच्यावर थेट शब्दांत टीका केली. ‘नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती, तू बोलतो किती,’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी त्यांना सुनावले आहे. निलेश राणे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता नवनाथ बन या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला विसंवाद आणखी वाढू नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. निवडणुकीच्या निकालाचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करा, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पण निवडणूक लांबणीवर?
महायुतीमध्ये नेमक्या कुठे चुका झाल्या आणि कोणत्या त्रुटींमुळे अपेक्षित निकाल मिळाला नाही, याचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. या अहवालावर महायुती समन्वय समिती आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. तसेच, शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सध्या माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका करू नये, अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. महायुतीमध्ये कोणताही विसंवाद निर्माण होऊ न देता सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असेही त्यांनी बजावले आहे.
एकीकडे निलेश राणे यांचा नवनाथ बन यांच्यावर हल्लाबोल, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे वाद थांबवण्याचे आदेश… अशा परिस्थितीत भाजप आणि शिवसेनेतील हा राजकीय संघर्ष नेमका कोणते वळण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.