शेतकऱ्यांचा अपमान भोवला! संजय गायकवाडांवर एकनाथ शिंदे संतापले, थेट पक्षातून निलंबनाचे आदेश?
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Eknath Shinde hints at suspension of Sanjay Gaikwad : वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पक्षातच त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. शेतकरी कुटुंबातील महिलांना 25 हजार शिलाई मशिन्स, तर शेतकऱ्यांच्या मुलींना 25 हजार सायकलींचे वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दसरा मेळाव्यानिमित्त 100 ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात पाठवण्यात आले, तर गुरुवारी आणखी 24 ट्रक धान्य रवाना करण्यात आले.
एकीकडे पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे संजय गायकवाड यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची भावना शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे समजते. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पण निवडणूक लांबणीवर?
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. एखाद्या शेतकऱ्याला अडचण असेल, तर त्याने आत्महत्या करण्याऐवजी आमदार किंवा खासदारांना पत्र लिहावे. आम्ही सर्वजण मिळून त्याची मदत करू, असे ते म्हणाले होते. मात्र, याचवेळी शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्या करतात आणि त्यांच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये, अशा आशयाचे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी संघटना, नागरिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, शिंदे गटातील नेत्या मीनाक्षी शिंदे यांनीही पक्षातील पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. मीनाक्षी शिंदे या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. पक्षांतर्गत दबावामुळे की अन्य काही कारणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, राजीनाम्यानंतर त्या ठाणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत राहणार आहेत. एकूणच, संजय गायकवाड यांच्यावरील संभाव्य निलंबनाची चर्चा आणि मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा यामुळे शिंदे गटातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.