Download App

अजितदादांचं कार्ड अन् १४ आमदार.. २९ महिन्यांत ‘खुर्ची’ फडणवीसांकडे ट्रान्सफर

राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता या नव्या सरकारमध्ये शिंदे दोन नंबरच्या भूमिकेत असतील ही बाब अधोरेखित झाली आहे. यामागे मुख्य कारण संख्याबळाचं सांगितलं जात आहे. पण २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी केली होती त्यावेळी देखील त्यांच्याकडील आमदारांची संख्या भाजपकडील आमदार संख्येपेक्षा कमीच होती. असे असतानाही एकनाथ शिंदेंनाच सीएमपद मिळालं होतं.

इतकंच नाही तर बिहारमध्ये सुद्धा नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयूकडे भाजपपेक्षा कमी जागा आहेत. तरी देखील नितीशकुमार मुख्यमंत्री आहेत. अशात आता चर्चा अशी सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे यांचं नेमकं चुकलं तरी कुठं? मुख्यमंत्रिपद त्यांना का मिळू शकलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या..

१४ आमदार भाजप समर्थक

विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. यातील १४ आमदार भाजप समर्थित आमदार आहेत. जिंकून आलेले सहा आमदार घोषित रूपाने भाजपचेच आहेत. यामध्ये राजेंद्र गावित, निलेश राणे, मुरजी पटेल, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे आणि विलास तारे या आमदारांची नावं प्रामुख्याने घेता येतील. एकनाथ शिंदेंनी चार अपक्षांनाही तिकीट दिलं होतं. आता हे चारही जण आमदार झाले आहेत. या अपक्षांना शिवसेनेचे तिकीट मिळवून देण्यात भाजपचा हात होता असेही सांगितलं जात आहे.

राणे, चव्हाण, फडणवीस अन् शिंदे.. कहाणी चार मुख्यमंत्र्यांच्या डीमोशनची

अशा परिस्थितीत जर एकनाथ शिंदे यांनी उठावाचा प्रयत्न केला असता तर आमदार साथ सोडण्याची भीती होती. बिहारमधील विकासशील इंसान पार्टीचे (व्हीआयपी) नेते मुकेश सहनी यांच्याबाबतीत असं राजकारण घडलं आहे. २०२२ मध्ये सहनी यांचे सर्व आमदार भाजपात सहभागी झाले होते. तशी परिस्थिती कदाचित महाराष्ट्रातही घडली असती. कारण, शिंदे गटातही असे बरेच आमदार आहेत ज्यांना सत्तेत सहभागी होणे जास्त महत्वाचे वाटत आहे.

अजित पवारांना विरोध करू शकले नाहीत

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात युती सरकार आलं होतं. यानंतर एक वर्षांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सरकारमध्ये एन्ट्री घेतली. अजित पवार यांच्या येण्याने शिंदे गटाचे राजकीय नुकसान झाले ही बाब कुणालाही नाकारता येणार नाही. अजित पवार यांच्यामुळे शिंदेंना भाजपवर पाहिजे तसा दबाव टाकता आलेला नाही. अजित पवार एनडीएमध्ये आल्यानंतर दबक्या आवाजात त्यांचा विरोध झालाही. पण हा विरोध कुचकामी ठरला. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरने देखील अजित पवार यांचा विरोध केला होता. तरीदेखील शिंदेंना हा मुद्दा उचलता आला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या गावी निघून गेल्यानंतर अजित पवार सक्रिय झाले होते.

निवडणुकीआधी चेहऱ्याची घोषणा नाही

नितीशकुमार प्रत्येक निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा करवून घेत असतात. २०१५ मध्ये नितीशकुमार लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याबरोबर होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःच्या नावाची घोषणा करवून घेतली होती. २०२० मध्ये भाजपही नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावरच निवडणुकीत उतरला होता.

आता आश्चर्याची आणखी एक गोष्ट म्हणजे २०२५ मधील विधानसभा निवडणुकीआधी (Bihar Elections 2025) नितीशकुमार यांनी नावाची घोषणा करवून घेतली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी अशा प्रकारची घोषणा करवून घेण्यात शिंदे कमी पडले. निवडणुकीत मिळालेला विजय हा सरकारच्या कामामुळे मिळाला असे शिंदे सांगत राहिले मात्र याच काळात त्यांनी स्वतः चं नाव काही पुढे केलं नव्हतं. त्यामुळे संख्याबळाच्या आधारावर भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला आणि पद मिळवलं देखील. मुख्यमंत्रिपदासाठी आधीच नाव निश्चित झालं नव्हतं. त्यामुळे शिंदेंना काहीही करता आलं नाही. काही दिवस त्यांनी दबाव वाढवला होता मात्र त्याचा भाजपवर याचा फारसा परिणाम झाला नाही. नैतिकतेच्या आधारावर देखील भाजप बॅकफूटवर तर गेलाच नाही.

उपमुख्यमंत्री फडणवीस आता मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात फडणवीस उपमुख्यमंत्री होते. एक प्रकारे ते शिंदेंच्या नेतृत्वात काम करत होते. पण आता फडणवीसच पुन्हा बॉसच्या भूमिकेत आले आहेत. भाजपने राज्याची कमान देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिली आहे. देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपचा चेहरा आहेत. याआधी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

सन २०२२ मध्ये जेव्हा शिंदे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री होते. यानंतर फडणवीस यांनी राजकीय डाव टाकण्यास सुरूवात केली. एनडीएमध्ये एकनाथ शिंदेचं पॉलिटिकल प्रेशर कमी करण्यासाठी अजित पवार यांना सोबत घेण्यात आलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी प्रचार शिगेला पोहोचला होता तेव्हा भाजपने हळूहळू फडणवीस यांचं नाव पुढे घेण्यास सुरुवात केली. यानंतर फडणवीस देखील जास्त आक्रमक होत गेले. संपूर्ण प्रचार काळात फडणवीस यांनी जवळपास ५६ रॅली केल्या. राज्यातील कोणत्याही नेत्याच्या प्रचाराच्या तुलनेत हा आकडा खूप मोठा आहे.

follow us