Download App

राणे, चव्हाण, फडणवीस अन् शिंदे.. कहाणी चार मुख्यमंत्र्यांच्या डीमोशनची

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याचं डीमोशन झालं.

Maharashtra Chief Minister : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या दहा दिवसांनंतर अखेर महायुती सरकारचा शपथविधी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याचं उत्तर मिळत नव्हतं. पण एकनाथ शिंदे यांनीही (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याचं डीमोशन झालं. मुख्यमंत्री राहिलेले तीन नेते डीमोशन घेऊन कॅबिनेटमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. यात आता एकनाथ शिंदेंचीही भर पडली आहे.

आधी बात नारायण राणेंची

सन 1995 मधील निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार अस्तित्वात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या खात्यात (Shivsena) गेलं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. पण लवकरच बाळासाहेबांनी ही खुर्ची नारायण राणे यांना दिली. राणे 1999 पर्यंत या पदावर राहिले. नंतरच्या काळात मात्र ते वेगळे पडले होते. 2004 साल उजाडेपर्यंत राणे आणि ठाकरे परिवारात खटके उडू लागले होते. नंतर 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. यानंतर राणे काँग्रेस पक्षात सहभागी झाले.

मोठी बातमी! 9 डिसेंबरला होणार विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

पुढे 2010 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या (Prithviraj Chavan) सरकारमध्ये राणेंना मंत्रिपद देण्यात आलं. या सरकारमध्ये नारायण राणे (Narayan Rane) उद्योग, खनन  विभागाचे मंत्री होते. तसेच त्यांनी काही काळ महसूलमंत्री म्हणूनही काम केलं होतं. पण यानंतर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला (Congress Party) सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश केला. 2021 मध्ये राणेंना थेट केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. आता सध्या राणे भाजप खासदार आहेत.

अशोक चव्हाणांच्या नशिबी डीमोशन

सन 2008 मध्ये स्व. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अशोक चव्हाण यांना (Ashok Chavan) मुख्यमंत्री केलं. 2009 मधील निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळी सुद्धा अशोक चव्हाण यांनाच मुख्यमंत्रिपद मिळालं. पण नंतर आदर्श घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. अशोक चव्हाणांच्या जागी काँग्रेसने दिल्लीच्या राजकारणात रमलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केलं होतं.

2014 मधील निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा सरकार रिपीट करता आलं नाही. 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर भाजपची साथ सोडली त्यावेळी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. या नव्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून अशोक चव्हाणांना मंत्रिपद मिळालं होतं. चव्हाण दोन वर्षे या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. पण 2024 मधील लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections) अशोक चव्हाणांनी आश्चर्याचा धक्का देत थेट भाजपात प्रवेश केला. चव्हाण सध्या राज्यसभा खासदार आहेत.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार 

यादीत देवेंद्र फडणवीसांचही नाव

मुख्यमंत्री पदावरून दूर होऊन उपमुख्यमंत्री होणं या डीमोशनमध्ये देवेंद्र फडणवीस यांचंही नाव आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस 2022 मध्ये उपमुख्यमंत्री झाले होते. यावेळी शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन भाजप सोबत आले होते. या घडामोडीनंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं. शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते.

follow us