CM होताच शरद पवारांच्या शिलेदारानं घेतली फडणवीसांची भेट; चर्चा तर होणारच..
Harshavardhan Patil : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) गुरुवारी शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महायुती सरकारच्या कामकाजाला आता सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्यासाठी सध्या राज्यातील नेते मंडळींची रिघ लागली आहे. सत्ताधारीच नाहीतर विरोधी पक्षांतील नेतेही त्यांची भेट घेत आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी काल फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. शरद पवारांनी त्यांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. दत्ता भरणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
पाटील म्हणाले, आज देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमु्ख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचं अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाली बनेल या सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील हीच अपेक्षा. त्यांना उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा अशी पोस्ट हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
दलबदलू 4 वेळा निवडून आले, पण इंदापूरचा विकास केला नाही; अजितदादांनी घेतला हर्षवर्धन पाटलांचा समाचार
विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळत नव्हतं. खरंतर अजित पवार महायुतीत आल्याने त्यांची कोंडी झाली होती. इंदापूर मतदारसंघ अजित पवार गटावा सुटला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. शरद पवार गटाने त्यांना तिकीट दिलं. मात्र त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. असे असताना त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राज्यात चर्चेची ठरली.
दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी स्वतः फोन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थिर राहिले नाहीत.