Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन येत्या मंगळवार (दि.2 मे) मुंबईत होणार आहे. या आत्मकथेत शरद पवार यांनी राजकारणातल्या अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. आताच्या ताज्या राजकीय समीकरणांची म्हणजेच राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचीही चर्चा त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीची जुळणी करताना कोणते घटक कारणीभूत ठरले ?, काय कारणे होती ? याचा उहापोह या पुस्तकात आहे.
शरद पवार म्हणतात, सन 2014 ते 2019 चा असा कालखंड होता या काळात सर्वार्थानं रोज आमची पीछेहाट होत होती. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकात आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही आमची कामगिरी निराशाजनक होती. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही फारसं काही उत्साहवर्धक घडत नव्हतं. स्वाभिमान गुंडाळून पक्ष सोडणाऱ्यांची कमतरता नव्हती. सत्ता आणि संपत्तीचे बळ सत्तारूढ आघाडीकडे अमाप होते. विरोधक औषधालाही दिसता कामा नयेत असा लोकशाहीशी विपरीत पवित्रा सत्तारूढ आघाडीने घेतला होता.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपशी हातमिळवणी केली खरी पण, त्यांच्यात परस्पर विश्वासाचा अभाव होता. या निवडणुकांनंतर दोन्ही पक्षांच्या नात्यातल्या समीकरणात अमूलाग्र बदल झाला होता. राज्यात युतीचं सरकार होत. पण, निर्विवाद वर्चस्व भाजपचं होतं.
Uday Samant : शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते, बारसू रिफायनरी प्रकरणात मध्यस्थी करावी
ते पुढे म्हणतात, भाजप-शिवसेना पक्षात जेव्हा केव्हा संवादाची गरज असे तेव्हा भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व मातोश्रीवर जात असे. बदलत्या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची हीच अपेक्षा भाजपकडून होती. बाळासाहेबांचं स्थान लक्षात घेत आमचे नेते मातोश्रीवर जात तीच अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी ठेवणं अनाठायी आहे, असा सूर भाजपातील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेचा किस्सा
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागातून तिचं उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन करता येणार नाही,असा सरळ राजकीय हिशेब भाजपचा होता. याच्यामुळे आपल्या अस्तित्वावर भाजप उठला आहे. याविषयी शिवसेनेच्या नेतृत्वात आणि त्यांच्या कार्यकर्त्यातही तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्यामुळे त्याचा उद्रेक झाला नाही परंतु आग धुमसत होती, असे सांगत पवार यांनी पंढरपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या एका सभेची आठवण करून दिली.
पंढरपूर इथल्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी आम्ही 25 वर्ष युतीत सडलो, अशा जळजळीत भाषेत भाजपवर कोरडे ओढल्यानंतर युतीच्या भवितव्याविषयी गंभीर प्रश्न उभे राहिले होते. एवढं घडूनही राजकीय संधी आपल्यासाठी खुली होते आहे असं काही अजूनही आम्हाला वाटत नव्हतं. लोकसभेच्या निवडणुका संयुक्तपणे महाराष्ट्रात लढाव्याच लागतील हे लक्षात घेत अमित शहा यांनी मातोश्रीच्या पायऱ्या चढण्याचा निर्णय घेतला आणि मनानं दुभंगलेली युती पुन्हा एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली.
उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय, दरेकरांचा हल्लाबोल
शहा यांनी मातोश्रीवर चर्चेसाठी गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना काही वेळ बाहेर ठेवत फक्त उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सल्लामसलत केली त्यात नेमके काय बोलणे झाले असावे, याविषयी राजकीय वर्तुळात अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या परंतु राजकारणातल्या काही चर्चा काळाच्या ओघातच उघड होत असतात, हेच खरं.
शिवसेना हा भावनिक पिंड असलेला पक्ष आहे. त्याच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा डाव रंगला होता. एकेकाळी महाराष्ट्रात शिवसेना विधानसभेच्या 171 जागा लढवत असे तर भाजप 117. शिवसेनेला 124 जागा सोडत भाजपने तब्बल 164 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचाच चंग अति आत्मविश्वासात दंग भाजपन बांधला होता, असे या आत्मकथेत म्हटले आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र येथे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार भाजपच्या छुप्या पाठिब्यावर शिवसेनेविरुद्ध लढत होते. तर 50 विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचे आव्हान होते. अशा बहुतेकांनी ठोकलेले दंड हे नेत्यांच्या आशिर्वादाने पक्षाच्या पाठबळावरच होते, हे आमच्याही लक्षात आल्याचं पवार यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.