Maharashtra Elections 2024 : ‘भूकंपाचं लातूर ही जुन्या काळातली ओळख होती. रेल्वेनं पाणी आणलेलं लातूर ही आताची ओळख झाली. लातूरमध्ये भरपूर नॉलेज पोटेन्शियल आहे पण येथे इंडस्ट्री नाही. देवेंद्र फडणवीसांनी एक काम दिलं. त्यात यश मिळवलं. त्यांनी मनासारखं खातं मागण्याची मुभा दिली. पण मी लातूरसाठी रेल्वे कोच कारखाना मागितला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो कारखाना लातूरला मिळाला. आता 25 डिसेंबरला या कारखान्यातून केंद्र सरकारच्या वंदे भारत रेल्वेचा कोच तयार होऊन बाहेर पडणार आहे. या कोचवर मेड इन लातूर असा शिक्का असेल, याचा आनंद आहे. ज्या ठिकाणी रेल्वेनं पाणी आणलं गेलं तिथंच रेल्वेचा कोच तयार होतोय याचा अभिमान आहे’, अशा शब्दांत निलंगा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे कोच कारखाना लातुरला कसा मिळाला याचा खास किस्सा सांगितला.
लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात निलंगेकरांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. ‘लातूरमध्ये आज पाण्याची कमतरता आहे. एक काळ असा होता की लातूरचं नाव आलं की भूकंपाचं लातूर अशी ओळख होती. नंतर आताच्या काळात रेल्वेने पाणी आलेलं लातूर अशी ओळख झाली. पण लातुरात जे नॉलेज पोटेन्शियल आहे हे कुणीच सांगत नाही. सर्वाधिक संख्येने डॉक्टर्स लातुरातील आहेत पुण्यातील नाही हे लक्षात घ्यावं लागेल. आमच्या येथील 2200 मुलं दरवर्षी मेडिकलला जातात. तरीही आमची ओळख वेगळी होते याचं कारण म्हणजे आमच्याकडे इंडस्ट्री नाहीत. आम्हाला सत्ता भरपूर मिळाली. आमचा विकास मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी खेचला ही जुन्या लोकांची विचार करण्याची पद्धत असेल पण मी म्हणतो, की आपल्या लोकांना तशी संधी असताना आपण ते का केलं नाही.’
‘मी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की जो मंत्री चांगला रिझल्ट आणेल त्या मंत्र्याला एखाद्या खात्यात जास्तीचं काम करायचं असेल त्या मंत्र्याला मी त्याच्या म्हणण्यांनुसार खातं देईल असं फडणवीस म्हणाले होते. ‘त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात सर्वात चांगला रिझल्ट महापालिका भारतीय जनता पक्षाची आणून दिली. जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरापर्यंत आम्ही संघटना उभी केली. निकालानंतर मी देवेंद्रजींकडे गेलो. त्यांना म्हणालो, तुम्ही शब्द दिलाय. ते म्हणाले सांग तुला कोणतं खातं पाहिजे? मी म्हणालो, माझा असा कोणताच आग्रह नाही. दिलेली जबाबदारी मी पार पाडतोय. पण केंद्राचा हा जो मेट्रो कोच म्हणजे रेल्वे कोच कारखाना जो महाराष्ट्रात येणार आहे तो लातुरला द्या. तुम्ही मला इतकाच शब्द द्या. ते एक मिनिट थांबले.’
संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात विकासाची गंगा वाहती; प्रचार सभेत बाळासाहेब शिंगाडेंच मत
‘मला अजूनही आठवतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येकाला वाटत होतं की तो कारखाना आपल्याकडे यावा. पण तो कारखाना आपण ह्या भागात आणला. याचं पूर्ण श्रेय या भागातील जनतेला जातं. त्यांनी विश्वास आमच्यावर दाखवला. त्याच विश्वासाच्या बळावर आम्ही देवेंद्रजींना सांगितलं आणि हा कारखाना आज उभा राहिलाय. 25 डिसेंबरला वंदे भारत रेल्वेचा पहिला कोच या कारखान्यातून बाहेर पडेल. जिथं रेल्वेने पाणी आणलं तिथंच रेल्वेचे कोच आम्ही तयार केले. जिथं कुठं वंदे भारतची रेल्वे दिसेल त्यावर आता मेड इन लातूर असं नाव असेल या गोष्टीचा आनंद आहे.’
निवडणुकीच्या आधी तुम्ही मतदारसंघात जनसन्मान यात्रा तुम्ही काढलीत मग आता मतदारसंघात काय परिस्थिती आहे? असे विचारलं असता ते म्हणाले, ‘या मतदारसंघात तुम्हाला दिसेल की कुणीच असं म्हणत नाही की भैय्या आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. येथे प्रत्येक जण अधिकाराने आणि हक्काने बोलतो. त्यामुळे मी नेता आणि कार्यकर्ता असं वातावरण आमच्याकडे दिसणार नाही. आज ही निवडणूक माझ्यापेक्षा माझ्या या परिवारातील लोकांनीच हातात घेतली आहे. या लोकांच्या विश्वासावरच मी सांगतोय की यंदा मतदारसंघातील जनता आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक भरभरून आशीर्वाद देईल.’
‘ज्यांनी मला राजकारणातल्या पहिल्या दिवशी पाहिलं आणि आज पाहताहेत त्यात कुणालाही विचारलं की भैय्या 2004 ला कसे होते आणि 2024 मध्ये कसे आहेत. माझ्या वजनात इंचभर देखील फरक नाही. राहणीमानात फरक नाही. लोकांकडे पदं आली तर त्यांच्या राहणीमानात बदल होतो. राहणीमानाचं एकवेळ समजू शकतो पण पद आली की भाषा बदलते. पण माझ्या बाबतीत असं नाही. माझी 2004 मधील भाषा आणि कनेक्ट आजही तसाच आहे.’
‘मला असं वाटतं की मी जर जॅकेट घालायला लागलो तर आज जे लोक माझ्या जवळ येत आहेत त्यांच्या मनात किंतु निर्माण होऊ शकतो. माझ्या राहणीमानामुळे माझ्या जवळच्या लोकांत अंतर निर्माण होऊ नये असं मला वाटतं.’
VIDEO: संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर कुणाचा प्रभाव; आई-वडिलांचा उल्लेख करत काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत एका नरेटिव्हचा फटका भाजपला बसल्याचं सांगितल गेलं, आज काय स्थिती आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना निलंगेकर म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीवेळी जे काही होतं ते आता विधानसभा निवडणुकीत असेल असं नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लोकशाही अधिक दृढ आहे. येथील लोक ठरवून ज्यांना निवडून आणायचं त्यांना आणतात. इतक्या बारकाईने ग्रामीण भागातले लोक मतदान करत असतात. त्यामुळे प्रत्येक निवडणूक वेगळी आहे. त्यावेळी आमच्या विरोधी पक्षांनी आमच्या विरोधात एक नरेटिव्ह करण्यात यश मिळवलं होतं. तेच नंतर होईल असं नाही. सदैवच तुम्ही सगळ्यांना वेड्यात काढताल असं काही नाही.’
‘फक्त नरेटिव्हमुळेच आमचा पराभव झाला असं म्हणणारा कार्यकर्ता मी नाही. कदाचित आमच्या कामातही काही गोष्टी कमी असतील. त्याचं आत्मपरिक्षण केलंय. ज्या ठिकाणी कमी होतो ते भरून काढण्याचा प्रयत्न निवडणुकीनंतरच्या सहा महिन्यांत आम्ही केलाय. आमच्या चुका आम्ही स्वीकारल्या. जनतेची माफीही मागितली. जनतेनेही ताकदीनं स्वीकारलं त्यामुळे मला विश्वास वाटतो की 2024 ला चांगलं रेकॉर्ड होईल.’