Download App

भाजपच्या विजयात लालू ठरणार गेम चेंजर; ‘मै भी चौकीदार’ नंतर ‘मोदी का परिवार’ वाचवणार

  • Written By: Last Updated:

Modi Ka Parivar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापला निवडणूक प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, त्या आधी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी मोदींना परिवार नसल्याचे भाष्य केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी याच टीकेला ढाल बनवत 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी हत्यार उपसलं आहे. 2019 मध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) टीकेनंतर ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू करण्यात आली होती. याचा परिणाम भाजपच्या बाजूने लागला होता. त्यामुळे यावेळी लालू यादवांनी केलेल्या टीकेची ढाल बनवलेल्या मोदी का परिवार 2024 साठी भाजपला लकी ठरणार का? याचा निकालावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?

2019 राहुल गांधींनी चौकीदार चोर है असे विधान केले होते. त्यावर भाजप नेत्यांनी नावाच्या आधी मै भी चौकीदार असे ठेवत पाठिंबा दर्शवला होता. राहुल गांधींच्या या टीकेची झळ मोदींना आणि भाजपला बसली नाही तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘मैं भी चौकीदार’ नावाची मोहीम राबवल्यानंतर 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये भाजपने आणखी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी मोदी का परिवार या मोहिमेचा निकालही मोदींच्या बाजूने लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2019 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘मैं भी चौकीदार’ मोहीम काय होती?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राफेलचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला होता. 2016 मध्ये भारताने फ्रान्ससोबत 36 नवीन राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. 2017 मध्ये काँग्रेसने राफेल लढाऊ विमान सौद्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तर, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

2019 मध्ये, न्यायालयाने या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता, परंतु राफेल लढाऊ कराराशी संबंधित संरक्षण मंत्रालयाची काही अंतर्गत कागदपत्रे मीडियावर लीक झाली होती. यानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी नैतिक विजयाचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरी केल्याचे म्हणत चौकीदार चोर है म्हणत मोदींवर टीका केली होती. राहुल गांधींच्या या टीकेची भाजप नेत्यांनी ढाल बनवत ‘मैं भी चौकीदार’ असे स्वतःच्या नावासमोरही लिहित मोहीम राबवली होती. या टीकेचा भाजपनं 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जोरदार वापर करून घेतला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदीशी संबंधित सर्व याचिका फेटाळत मोदी सरकारला क्लीन चिट दिली होती.

लोकसभेसाठी BJP चं कौटुंबिक कार्ड; मी चौकीदार नंतर, मी मोदींचं कुटुंब’; नेत्यांनी बदललं ‘X’ बायो

‘मैं भी चौकीदार’ या घोषणेचा निवडणूक निकालांवर काय परिणाम झाला होता?

23 मे 2019 रोजी लोकसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा भाजपने दणदणीत विजय नोंदवला. 2019 मध्ये भाजपने 543 पैकी 436 जागांवर उमेदवार उभे केले होते. पक्षाने उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्या होत्या. यावेळच्या निवडणुकांमध्ये पक्षाला 2014 च्या तुलनेत 303 जागा जास्त मिळाल्याने हा आकडा लोकसभेतील 272 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त होता. तर काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या होत्या. अशाप्रकारे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 351 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला (UPA) केवळ 90 जागा मिळाल्या होत्या. निकालानंतर 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे 2019 मध्ये ‘मैं भी चौकीदार’ ही घोषणा भाजपसाठी फायद्याची ठरली होती. त्याचप्रमाणे यावेळच्या लोकसभेसाठी लालूंनी दिलेली ‘मोदी का परिवार’ ही टॅग लाईन भाजपसाठी किती लकी ठरणार आणि पुन्हा भाजप आणि मोदींना भरघोस मताधिक्याने एकहाती सत्तेत बसवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज