Download App

चार राज्यांचं भाजपाच्या मेहनतीवर पाणी.. दक्षिण अन् पूर्वेतला विजयही झाकोळला

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.

Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान अन् महाराष्ट्र ही चार अशी राज्य आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं. त्यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने दिलेला दणका भाजपला बहुमतापासून दूर घेऊन गेला. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही यात या दोन राज्यांचा वाटा मोठा आहे. त्या खालोखाल राजस्थान आणि हरयाणा या राज्यांचाही समावेश आहे. खरंतर या निवडणुकीतही भाजपने शानदार कामगिरी केली. परंतु उत्तर प्रदेशात फक्त 47, पश्चिम बंगालमध्ये 6 आणि महाराष्ट्रात 14 जागांचं नुकसान भाजपला सहन करावं लागलं. यामुळे अन्य राज्यातील यशही झाकोळलं गेलं.

लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. मागील दोन निवडणुकांप्रमाणे बहुमत मिळाले नाही. एनडीए आघाडीला मात्र बहुमत मिळालं आहे. या बहुमताच्या जोरावर एनडीए सरकार केंद्रात अस्तित्वात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत कामकाजाला सुरुवातही केली आहे.  या गोष्टी घडून गेल्यानंतर आता भाजपच्या खराब कामगिरीची कारण शोधली जात आहेत.

या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही यात काहीच शंका नाही परंतु आजही भाजप 240 जागा जिंकून देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकी आधी केलेल्या आघाडीने 292 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. पण या यशाची कुठेच चर्चा होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या मोठ्या राज्यांतील खराब कामगिरी.

अतिआत्मविश्वास नडला; आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेतृत्वावर आगपाखड !

यूपी अन् महाराष्ट्राचा सर्वाधिक फटका

उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक फटका बसला. येथे फक्त 33 जागा जिंकला आल्या. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या  सहा जागा कमी झाल्या. त्यामुळे भाजप या राज्यात 12 जागांवर आला. महाराष्ट्रात तर भाजपला खूप मोठा फटका बसला. मागील निवडणुकीत चांगली कामगिरी करत भाजपने 23 खासदार निवडून आणले होते. आता याच राज्यात दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. भाजपने कशातरी 9 जागा जिंकल्या.

हरियाणात खट्टरच भाजपला नडले

हरयाणात भाजपला मोठा धक्का बसला. निवडणुकीआधी येथे घडलेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम निवडणुकीत दिसला. जनतेची माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावरील नाराजी पक्षाला भोवली. मागील निवडणुकीत भाजपने सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. आता या जागा पाचने कमी झाल्या आहेत. याच पद्धतीने राजस्थानात 10 जागांचा फटका भाजपला बसला आहे.

केरळमध्ये खातं, तेलंगणात काँग्रेसच्या बरोबरीच्या जागा

या पडझडीमुळे भाजपाचा चांगला परफॉर्मन्सही झाकला गेला आहे. या निवडणुकीचं एक वैशिष्ठ्य म्हणजे भाजपने पहिल्यांदाच केरळ मध्ये खात उघडलं आहे. ज्या राज्यात 1950 पासून एकदाही भाजपाचा उमेदवार विजयी झाला नाही तेथे सुरेश गोपी यांच्या रूपात पाहिला खासदार मिळाला आहे. तेलंगणा राज्यात तर काँग्रेसचं सरकार आहे. असे असतानाही येथे भाजपने जोरदार टक्कर देत काँग्रेसच्या बरोबरीने जागा घेतल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी आठ जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या 39 पैकी 30 आमदारांचा ‘शून्य’ उपयोग : अजितदादांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ

कर्नाटकात काँग्रेसचं सरकार तरीही भाजपाचं कमी नुकसान

कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसेल असे सांगितले जात होते. परंतु असे काही घडले नाही. पण काही जागा नक्कीच कमी झाल्या आहेत. या राज्यात भाजपला 17 आणि सहकारी जेडीएसला दोन जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत कर्नाटकात एकट्या भाजपला 28 पैकी 25 जागा मिळाल्या होत्या. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षांशी हातमिळवणी करत भाजपने चांगली कामगिरी केली. या राज्यातही भाजप सत्तेत सहभागी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने चांगली कामगिरी केली आहे.

ओडिशात लोकसभा, विधानसभेत भाजपाची कमाल

भारताच्या पूर्वेकडील राज्य ओडिशात तर भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. राज्यातील लोकसभेच्या 21 पैकी तब्बल 19 जागा जिंकल्या. तसेच विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा दारुण पराभव करत राज्याची सत्ताही काबीज केली. अशा पद्धतीने भाजपने आणखी एका राज्यात सत्ता मिळवली. शिवाय लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित होण्याच्या एक दिवस आधीच अरुणाचल प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवलं.

 

follow us

वेब स्टोरीज