Year Ender 2024 : आता 2024 वर्ष संपण्यासाठी फक्त दोन दिवस राहिले आहेत. या वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या ज्या सहजासहजी विसरणे शक्य होणार नाही. फक्त भारतातच नाही तर जगात या वर्षात अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांच्या जगाच्या राजकारण आणि समाजकारणावरील परिणाम दीर्घकाळ राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या अशा कोणत्या घटना होत्या ज्या कायम स्मरणात राहतील.
सन 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय (Supreme Court) दिल्यानंतर अयोध्येत मंदिराचं (Ram Mandir) बांधकाम सुरू झालं. आणि 22 जानेवारी 2024 मध्ये मंदिराची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका झाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांना इलेकटोरल कॉलेज मध्ये 295 आणि कमला हॅरिस यांना 226 मते मिळाली. आता 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. बहुमत पार करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला फक्त 240 जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशातील 80 पैकी फक्त 37 जागा मिळाल्या. भाजपसाठी सर्वाधिक निराश करणारा निकाल अयोध्येचा राहिला. ज्या अयोध्येत मोठ्या उत्साहात राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. तेथील फैजाबाद मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. येथे समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी भाजपचे लल्लू सिंह यांचा 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
याच वर्षात तिरुपती मंदिरातील भेसळीचे प्रकरण समोर आले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच हे प्रकरण उजेडात आणले होते. आधीच्या जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात मंदिरातील लाडू प्रसाद तयार करण्यासाठी जनावरांची चरबी आणि फिश ऑईल वापरण्यात येत होते असे त्यांनी सांगितले होते. टीडीपी सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी जे. श्यामला राव यांना तिरुपती देवस्थानच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी नियुक्त केले. त्यांनीच प्रसादाचा दर्जा तपासण्याचे आदेश दिले होते.
सन 1971 मध्ये बांगलादेशक्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीत 30 टक्के कोटा दिला जात होता. या विरोधातच विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. हळूहळू या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. आता 2025 या वर्षाच्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला बांग्लादेशात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी पहिल्यांदा लोकसभेत विरोधी पक्षनेते बनले. दहा वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला. मागील दोन निवडणुकीत काँग्रेसकडे आवश्यक 10 टक्के सीट शेअर नव्हता त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसला दावा करता आला नव्हता.
सारियात अनेक वर्षांपासून गृहयुद्धाची परिस्थिती होती. राष्ट्रपती बशर अल असद यांच्या विरुद्ध अनेक गट संघर्ष करत होते. 27 नोव्हेंबर रोजी विद्रोही गटांनी शहरांवर कब्जा करण्यास सुरुवात केली. यानंतर मुख्य गटाने बशर अल असद यांना देश सोडून जाण्यास भाग पाडलं. असद यांनी देश सोडल्यानंतर अनेक शहरांत जल्लोष करण्यात आला. सीरियात असद परिवार मागील 53 वर्षांपासून सत्तेत होता.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या सदस्यांना ठार करण्यासाठी इस्त्रायलने पेजरचा हत्याराच्या रुपात वापर केला. यामधील विस्फोटक पदार्थाचा अगदी वेळेवर स्फोट झाला. हिजबुल्लाचे दहशतवादी सुद्धा या पद्धतीचा सातत्याने वापर करत होते. इस्त्रायलनेही नंतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. विशेष म्हणजे इस्त्रायलने अत्यंत संयमाने आणि नियोजनपूर्वक ही कारवाई घडवून आणली.