Download App

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारातील उपस्थिती म्हणजे थेट सामील; शरद पवारांचा पाकिस्तानवर वार

भारत गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याने त्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

Sharad Pawar on Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती दहशतवादी कारवायांमध्ये त्यांची साथ असल्याचं (Operation) उघड करते असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल ते साताऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

भारत गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याने त्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या कार्यक्रमाला त्यांची कन्या व लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे देखील उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले की, भारताने कधीही दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिलेला नाही. जे काही घडत आहे ते पहलगाम हल्ल्याच्या रूपाने झालेल्या दहशतवादी कारवाईचा परिणाम आहे. पाकिस्तान या घटनेत आपला हात असल्याचा इन्कार करत आला आहे. पण आता त्यांची साथ स्पष्ट झाली आहे.

पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारतीय हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. जर त्यांच्या सरकारची दहशतवादात कोणतीही भूमिका नव्हती, तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी या अंत्यसंस्कारात भाग घेण्याचा काय अर्थ आहे? ते म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचे समर्थन केले आहे. पंतप्रधान आणि इतर नेत्यांनीही या भूमिकेवर वारंवार भर दिला आहे.

India-Pak War : पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या IMF कडे इतके पैसे कुठून येतात?

पवार यांनी यावर जोर दिला की, जेव्हा नागरिकांची सुरक्षा धोक्यात येते, तेव्हा सध्या उचलली जाणारी पावले आवश्यक ठरतात. ते म्हणाले की, आपले सशस्त्र दल आवश्यक खबरदारी घेत आहेत. त्यांची कामगिरी पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. आज भारतीय संरक्षण दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत. ऑपरेशन सिंदूरवर माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा उल्लेख करत पवार यांनी सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागाची प्रशंसा केली आणि संरक्षण मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात घेतलेल्या एका निर्णयाची आठवण करून दिली.

ते म्हणाले की, जेव्हा मी संरक्षण मंत्री होतो, तेव्हा मी सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या प्रमुख भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला होता. सुरुवातीला तिन्ही सेना प्रमुखांनी ही कल्पना फेटाळून लावली होती. पण चौथ्या बैठकीत मी आग्रह धरला की सशस्त्र दलांमध्ये महिलांचे किमान 9 टक्के प्रतिनिधित्व असावे. पवार म्हणाले की, सीमेवरील परिस्थितीबद्दल देशाला माहिती देणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी एक मुस्लिम समाजातील आहे. यावरून हे दिसून येते की, लोक, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, आपल्या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी कोणतेही बलिदान देण्यास तयार आहेत.

follow us