Journey of Sitaram Yechury: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपे) नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं आज (मंगळवारी) दुपारी तीन वाजता निधन झालं. 10 सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital in Delhi) दाखल करण्यात आलं होतं. ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सीताराम येचुरी यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी जाणून घेऊ.
फडणवीस चाणक्य हुशार वाटायचे पण फोडाफोडीतच हुशार; मनोज जरांगेंची जहरी टीका
सीताराम येचुरी हे राष्ट्रीय पातळीवरील मार्क्सवादी नेते असून त्यांची राजकीय-वैचारिक जडणघडण डाव्या चळवळीत झाली. एक सामान्य कार्यकर्ता ते महासचिव या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. येचुरी यांनी आपले संपूर्ण आयुष्य डाव्या चळवळीसाठी खर्च केलं. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता आणि बांधिलकी यामुळं ते अनेकांचा आदर्श होते.
शिक्षण आणि बालपण…
सिताराम येचुरींचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते वाहतूक विभागात अभियंता होते. तर आई कल्पकम येचुरी सरकारी अधिकारी होत्या.
सीताराम येचुरी यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथे झालं. त्यानंतर त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) मधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. पुढं त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले, तेथूनच त्यांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
स्टुडंट फेडरेशनमधून सक्रीय राजकारणाला सुरूवात….
1970 च्या दशकात, विद्यार्थीदशेत असताना येचुरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले. नंतर त्यांची SFI चे प्रमुख म्हणून निवड झाली आणि ते संघटनेचे अध्यक्षही बनले. येचुरी यांनी 1975 च्या आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी आंदोलन केलं आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. यानंतर ते सीपीआय(एम)चे महत्त्वाचे नेते बनले.
1984 मध्ये येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनले. त्यांनी पक्षाचे मुखपत्र पीपल्स डेमोक्रसीचे संपादक म्हणूनही अनेक वर्षे काम केले.
2015 मध्ये सरचिटणीस…
2005 मध्ये ते राजकीय कार्यकारिणीत सामील झाले आणि 2015 मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस बनले. ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांच्यानंतर येचुरी यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशात विविध आंदोलने आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. यानंतर 2018 आणि 2022 मध्ये त्यांची पुन्हा त्याच पदावर फेरनियुक्ती झाली.
खासदार ते यूपीए सरकारमधील महत्त्वाचे नेते…
येचुरी हे 2005 मध्ये पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी 2005 ते 2017 दरम्यान राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले. संसदेत त्यांनी विविध प्रश्नांवर, विशेषत: कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हक्क आणि समस्यांवर आवाज उठवला. त्यांची संसदेतील अनेक भाषणे प्रसिद्ध झाली. येचुरींनी 2004 मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेदरम्यान आघाडीत मोठी भूमिका बजावली होती.
दरम्यान, येचुरी यांच्या निधनामुळं डाव्या चळवळीवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने देशातील डाव्या चळवळीची – परिवर्तनवादी चळवळीची मोठी झाली असून दुर्लक्षित-वंचित घटकाचा आवाज हरवल्याची भावना जनमाणसातून व्यक्त होतेय.