गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय मीडिया आणि सोशल मीडियामध्ये अमृतपाल सिंग नावाची मोठी चर्चा सुरु आहे. त्याला अनेक कारणेही आहेत. अमृतपाल सिंग खालसा प्रकरण नक्की काय आहे?
“मैं भारतीय नहीं हूँ, पंजाबी हूँ।”
“हमें वह पूरा खित्ता चाहिए जहां पंजाब पहले रूल करता था, पहले हिंदुस्तान से लेंगे फिर पाकिस्तान भी जाएंगे।
हे दोन्ही वाक्य आहेत, पंजाबमधील एका २९ वर्षीय तरुणाची, नाव अमृतपाल सिंग खालसा. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय मीडिया आणि सोशल मीडियामध्ये या नावाची मोठी चर्चा सुरु आहे. त्याला अनेक कारणेही आहेत.
अमृतपाल सिंग सध्या चर्चेत आला तो 23 फेब्रुवारीच्या दिवशी. कारण त्या दिवशी अमृतपाल आपल्या काही साथीदारांसोबत त्याच्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी थेट पोलीस चौकीत गेला. त्या दिवशी मोठा हंगामा झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला २४ तासामध्ये सोडून दिले जाईल, असं सांगितल्यानंतरच तो पोलीस चौकीतून बाहेर पडला.
Amritpal Singh Operation : २० दिवसांपूर्वी ठरला होता ‘ॲक्शन प्लॅन’… अमित शहांना दिली होती धमकी!
या प्रकरणाच्या काही काळ आधी म्हणजे १९ ऑगस्ट २०२२ च्या दिवशी अमृतपाल दुबईहून भारतात आला आणि पंजाबच्या राजकारणात त्याचा प्रवेश झाला. १९९३ साली जन्म झालेला अमृतपाल २०१२ साली फक्त बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दुबईला गेला. अमृतपाल सिंग सध्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आहे.
‘वारीस पंजाब दे’ संघटनेची सुरुवात अभिनेता दीप सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान केली होती. दीप सिंग सिद्धू हा तोच व्यक्ती आहे ज्याने २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ फडकावला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये दीप सिद्धूचे कार अपघातामध्ये निधन झाले. पण अमृतपालच्या समर्थकांचे म्हणणे आहे की दीपची हत्या झाली.
अमृतपाल स्वत: दीप सिद्धूला कधी भेटला नव्हता, पण शेतकरी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर त्याच्याशी चर्चा करत असे. पण दीपच्या पुण्यतिथीच्या दिवशी अमृतपालने सांगितले की दीपच्या सल्ल्यानेच नोव्हेंबर २०२१ पासून केस कापणे बंद केले होते. २५ सप्टेंबर २०२२ च्या दिवशी अमृतपालने आनंदपूर साहिब येथे सुमारे ९०० लोकांसह अमृतधारी शीख बनण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला. त्याच्या ४ दिवसांनंतर हजारो शीख जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या रोडे गावात जमले आणि अमृतपालच्या दस्तरबंदीत सामील झाले
पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीची आंदोलने वाढल्यानंतर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की ते आणि त्यांचे सरकार ही खलिस्तान चळवळ मुळापासून संपवून टाकतील. त्यावर अमृतपाल याने उत्तर दिले होते. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या 2006 च्या निकालानुसार खलिस्तानच्या बाजूने शांततेच्या मार्गाने बोलणे हा गुन्हा नाही. त्याच वेळी इंदिरा गांधींचा संदर्भ देत अमृतपाल म्हणाले की अमित शाह जे बोलत आहेत तेच इंदिरा गांधींनी सांगितले होते आणि त्याचा परिणाम अमित शाह यांच्या बाबतही होऊ शकतो.
अभिनेता दीप सिद्धूचा मृत्यू आणि गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या यामुळे पंजाबमधील तरुण वर्गाला मोठा धक्का बसला आहे. अशा काळात अमृतपाल सिंग आक्रमक तरुणाच्या आयडॉल असण्याची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. बोलण्याची आक्रमक शैली आणि खलिस्तानचे समर्थन यामुळे त्याला आणखी पाठिंबा मिळाला. यात पंजाबमधील बेरोजगारी, नशा आणि पंजाबी मूळ यावर बोलून त्यांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
७० च्या दशकात जर्नेलसिंग भिंद्रनवाला देखील असेच काहीसे करत होते. याशिवाय अमृतपाल भिंद्रनवालासारखीच निळी पगडी घालतो. अशा मुद्द्यामुळे अमृतपालची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाला यांच्याशी होऊ लागली आहे. त्यामुळेच अमृतपालला भिंद्रनवाला पार्ट – २ असंही बोललं जात आहे.
गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी मोगा जिल्ह्यातील रोडे गावात ‘वारीस पंजाब दे’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खरे तर हे भिंद्रनवाला यांचे वडिलोपार्जित गाव आहे.
आपल्या त्याच गावातील भाषणात अमृतपाल म्हणाले होते, “भिंद्रनवाला माझी प्रेरणा आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालेन. मला त्याच्यासारखे व्हायचे आहे कारण प्रत्येक शीख व्यक्तीला तेच हवे आहे. मला धर्मस्वातंत्र्य हवे आहे. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब या भूमीला समर्पित आहे. पूर्वी याच गावातून आमचे युद्ध सुरू झाले होते. भविष्यातील युद्धही याच गावातून सुरू होणार आहे.”
अमृतपालचे वाढते गुन्हे आणि वाढत पाठिंबा यामुळे पंजाब पोलीस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकार देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून अमृतपालच्या अनेक साथीदारांना अटक केली आहे. पण अमृतपाल फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याच्या समर्थनार्थ लोक जमा होत असल्याने सरकारने पंजाबमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद केली आहे.
दुसरीकडे आजच लंडनमधील भारतीय दूतावासासमोरील तिरंगा खलिस्तानी समर्थक लोकांनी खाली उतरवला आहे. त्यामुळे खलिस्तानी आंदोलन आणि अमृतपाल प्रकरण एकंदरीत आणखी काही दिवस चर्चेत राहील, एवढं नक्की.