Download App

मोघेंविरोधात काँग्रेसचे ‘सात’ जण एकवटले… भाजपसाठी ‘पारवेकर’ ठरणार गेमचेंजर

‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’…

अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा असाच विरोध सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्णी केळापूरचे माजी आमदार शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांना सहन करावा लागत आहे.

शिवाजीराव मोघे म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते. यवतमाळमधील आदिवासी समाजावर मोघेंची चांगली पकड. तब्बल पाचवेळा ते केळापूर मतदारसंघातून आमदार झाले. अनेक वर्षे मंत्री राहिले. यंदाच्या निवडणुकीत ते मुलगा जितेंद्र मोघे (Jitendra Moghe) यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पण काँग्रेसमधील (Congress) स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जितेंद्र यांना तीव्र विरोध आहे. त्यातूनच मोघे यांच्याविरोधात काँग्रेसमधील सात इच्छुक एकवटले आहेत. आमच्यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी द्या, पण मोघे यांना नको. किती दिवस मोघे यांच्याच सतरंज्या उचलायच्या? असा सवाल हे सातही इच्छुक विचारत आहेत.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भाजपचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्याही उमेदवारीला पक्षातून तीव्र विरोध ऐकू येत आहे. पाच वर्षांपूर्वी धुर्वे यांना निवडून दिले, पण त्यानंतर त्यांनी समाधानकारक काम केलेले नाही, अशी तक्रार भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमधूनही नवीन चेहरा देण्याची मागणी होत आहे. नेमका जितेंद्र मोघे यांना हा विरोध का आहे? हे विरोध करणारे सात जण आहेत तरी कोण? संदीप धुर्वे यांच्याविरोधात भाजपमधील पदाधिकारी का एकवटले आहेत? धुर्वे नसतील तर भाजपमधून कोण असू शकते?

याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहुया आपण लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून…

आर्णी-केळापूर हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी केळापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जात होता. 2009 मध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये आर्णी, घाटंजी, केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, पांढरकवडा महसूल मंडळे यांचा मिळून नवीन अर्णी-केळापूर हा मतदारसंघ तयार झाला. घाटंजी तालुका लहान असल्याने आणि केळापूर तालुका दोन मतदारसंघात विभागला गेल्याने अर्णी तालुक्यात अधिक मतदार झाले. त्यामुळे मतदारसंघाला आर्णी हे नाव देण्यात आले.

मात्र याच केळापूर-घाटंजी तालुक्‍यात पारवेकर घराणे इजारदार म्हणून ओळखल्या जात होते. या भागातील जनता पारवेकर घराण्यावर अतोनात प्रेम करायची. म्हणून मागील 50 वर्षांपासून या मतदारसंघात पारवेकर घराणे हात ठेवेल तोच उमेदवारच निवडून येत होता. मग ते शिवाजीराव मोघे असो किंवा जनता दलाचे देवराव गेडाम असोत की अगदी भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम आणि विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे असोत. हे सारेच पारवेकरांच्या सहकार्याशिवाय विधानसभेत पोहचू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

Letsupp Ground Zero : सुनील केदार यांचे ग्राऊंड उद्ध्वस्त होणार? भाजपचे तीन प्लेअर तयार!

या मतदारसंघात पारवेकर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या जोरावर ते 20 ते 25 हजार मतांचे पॅकेट घेवून आहेत. त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी त्यांचा कल सर्वाधिक महत्वाचा असतो. यातूनच त्यांना या मतदारसंघात किंग मेकरच्या भुमिकेत पाहिले जाते. त्यांच्याच आशिर्वादाने गतवेळी धुर्वे आमदार झाले होते. यंदा त्यांनी पक्षश्रेष्ठींना भाजपकडून उमेदवारीसाठी दोन नावांची यादी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी अण्णासाहेबांचे आशीर्वाद कुणाच्या पाठीशी असतील, हे आज तरी सांगता येणे शक्य नाही. तेही आपले पत्ते नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी उघडतील.

भाजपचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांनाही पक्षांतर्गत मोठा विरोध असल्याचे पाहायला मिळते. धुर्वे यांच्या मनमौजी कार्यपध्दतीमुळे सर्वसामान्य जनतेने त्यांच्यापासून चार हात दुर राहणेच पसंत केले, असा आरोप त्यांच्याच पक्षातून केला जातो. 2019 च्या निवडणुकीमध्ये धुर्वे यांना विजयी करून आपली चूक झाल्याची जाणीवही मतदार संघातील जनतेला, त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यपध्दतीनंतर झाली आहे, असा दावा भाजपमधीलच काही इच्छुकांकडून केला जात आहे. पारवेकरही धुर्वे यांच्या पाच वर्षांच्या कामावर समाधानी नाहीत, असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे भाजपकडून पर्याय न दिल्यास पदाधिकारी आणि कार्यकर्तेच धुर्वेचे काम करतील की नाही, याबाबतच शंका आहे.

आता या मतदारसंघातून भाजपकडून गोंड समाजातीलच रितेश परचाके, मोहन कन्नाके, डॉ. मनीष वाढिवे, अमोल मंगाम आणि नितीन मडावी हे इच्छुक आहेत. यातही मनीष वाढिवे आणि नितीन मडावी यांच्या नावाची चर्चा आहे. नितीन मडावी हे मुळचे वर्धा जिल्ह्यातील. ते वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. गतवर्षी त्यांनी शेजारच्याच राळेगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी केली होती. मात्र भाजपने अशोक उईके यांचे तिकीट कायम ठेवले, त्यामुळे मडावी यांना थांबावे लागले होते. मडावींनी यंदा अर्णी-केळापूरमधून तयारी सुरु केली आहे.

Ground Zero : नाना पटोले पुरुन उरणार? साकोली भाजपला अवघडच!

तर डॉ. वाढिवे हे मतदारसंघातील उच्चशिक्षित चेहरा म्हणून ओळखले जातात. वाढिवे हे सध्या यवतमाळच्या आबासाहेब पारवेकर यांच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांचे वैद्यकीय शिक्षण झाले असून ते यापूर्वी मेळघाटच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी राहिलेले आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिलेली आहे. इतिहास, राज्यशास्त्र, इंग्लिश अशा विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, सेट, नेट, पीएचडीचे शिक्षण झाले आहे. सध्या वाढिवे यांच्या गाव भेटी, जनसंवाद यात्रा सुरू आहेत. तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी, आरएसएसचे पदाधिकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या वरिष्ठ वर्तुळात सुद्धा भेटी झालेल्या आहेत.

याशिवाय माजी आमदार राजू तोडसामही पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्यावर असलेले न्यायालयीन निर्बंध दूर झाल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांनी मागील काही दिवसांपासून वातावरण निर्मिती केली आहे. भाजपकडूनच आपले तिकीट निश्चित असल्याचे ते मतदारांना सांगत आहेत. तोडसाम यांच्या या दाव्यामुळे आणि याबाबत वरिष्ठांकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने इतर इच्छुकही बुचकाळ्यात पडले आहेत.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांच्या नावाची चर्चा आहे. पण त्यांना काँग्रेसमधूनच प्रचंड विरोध आहे. काही वर्षांपूर्वी जितेंद्र मोघे हे आपल्या शैक्षणिक कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. पण तिथले शिक्षण अर्धवट सोडून मागील पाच वर्षापासून स्थानिक राजकारणात आणि विधानसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. मात्र पक्षातील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात ते अपयशी ठरल्याचे बोलले जाते.

या विरोधाला दुसरी बाजू ही इथली भौगोलिक रचना आहे. या मतदारसंघात जवळपास चार लाख मतदान आहे. त्यात सर्वाधिक दीड लाखांच्या आसपास आदिवासी मतदार आहेत. त्यातही सव्वा लाखांवर आदिवसींमधील गोंड समाजाचे प्राबल्य आहे. पण 1985 पासून काँग्रेसने बहुसंख्य असलेल्या गोंड समाजात उमेदवारी दिलेली नाही. या उलट जेव्हा जेव्हा विरोधी पक्षाने आदिवासींमधील गोंड समाजाचा उमेदवार दिला तेव्हा तेव्हा कॉंग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघेंचा पराभव झालेला पहायला मिळाला.

यात मग जनता दलाच्या चिन्हावर निवडून आलेले देवराव गेडाम असो की भाजपकडून निवडून आलेले राजू तोडसाम, डॉ.संदीप धुर्वे असोत. काँग्रेसच्या याच भुमिकेमुळे या मतदारसंघातील सव्वा लाख गोंड समाजातील मतदारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे, असा दावा करत माणिकराव तोडसाम, विठ्ठलराव मरापे, बळवंत नैताम, प्रा. निनाद सुरपाम, दत्तात्रय मंत्राम, अजय आत्राम, अजय घोडाम हे गोंड समाजातील सात इच्छुक उमेदवार मोघे यांच्याविरोधात एकवटले आहेत. आम्ही काय आयुष्य मोघेंच्याच सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल करत गोंड समाजातील उमेदवाराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी या सातही जणांनी केली आहे.

लोकसभेला काँग्रेसला कौल, विधानसभेला काय होणार?

अर्णी-केळापूर हा मतदारसंघ लोकसभेला चंद्रपूर मतदारसंघात येतो. गत निवडणुकीत राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा या सर्वच विधानसभा क्षेत्रात हंसराज अहीर यांना फटका बसला होता. पण या मतदार संघात अहीर यांना 58 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या मताधिक्‍यात केळापूर, घाटंजी या तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद सर्कलमध्येच भाजपला जवळपास 57 हजाराचे मताधिक्‍य होते. यंदा मात्र या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 19 हजार 564 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विधानसभेला काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us