पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा शांत नेत्यांच्या रांगेत काँग्रेसला मिळालेला आक्रमक चेहरा म्हणजे नाना फाल्गुनराव पटोले (Nana Falgunrao Patole). 2017 मध्ये भाजपचे खासदार असलेले नाना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भिडले. घसघशीत बहुमत असलेल्या मोदींविरोधात बोलण्याचं धाडस भाजपमध्ये कोणाचही नव्हतं. पण नानांनी भीड ठेवली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन वातावरण तापवलं आणि देशभरात चर्चेत आले. मोदींना विरोध करत थेट खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमधून बाहेर पडले.
खरंतर नाना पटोले यांच्यासाठी ही कृती म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती. नागपूरमध्ये लोकसभेला (Nagpur Lok Sabha) त्यांचा पराभव झाल्यानंतर तर ‘नानांचं’ राजकारण संपलंच यावर मोहोर लागली. भाजपनेही त्यांना घरी बसवण्याचा चंगच बांधला होता. पण साकोली मतदारसंघ नानांच्या पाठीशी होता. भाजपच्या परिणय फुके यांना पराभूत करुन ते विजयी झाले. संपले संपले म्हंटले जाणारे नाना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर थेट विधानसभा अध्यक्ष झाले आणि तिथून काही दिवसातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. (BJP could not find a candidate against Nana Patole of Congress in Sakoli Assembly Constituency)
भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखानी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांचा मिळून साकोली विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. 2009 पर्यंत साकोली आणि लाखांदूर हे दोन्ही वेगळे मतदारसंघ होते. यात लाखांदूरवर भाजपचा वरचष्मा होता. 1980 मध्ये इथे पक्ष नवीन असूनही भाजपने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. 1985, 1990 आणि 1995 मध्ये तर आमदारही निवडून आले होते. अशा मतदारसंघात पटोले यांनी 1995 मध्येच अपक्ष उडी घेतली. पण 19 हजार मते घेत ते चौथ्या क्रमांकावर राहिले. 1999 मध्ये त्यांनी काँग्रसचे तिकीट खेचून आणले आणि 16 हजारांच्या मताधिक्याने निवडूनही आले. 2004 मध्ये नाना पटोलेंचे लीड तब्बल 41 हजार होते.
2008 मध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचे म्हणत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून राजकारण सुरु ठेवले. 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यात तब्बल दोन लाख 37 हजार मते घेतली. पटोले यांच्या या सगळ्या उठाठेवीमागे मतदारसंघाचेही राजकारण होते. त्यावेळी मतदारसंघाची पुनर्रचना होऊन नानांचा लाखांदूर मतदारसंघ साकोलीला जोडला होता. इथे काँग्रेसचे सेवक वाघाये आमदार होते. वाघाये यांनीच नानांना कधीकाळी पहिल्यांदा आमदार होण्यासाठी मदत केली होती. वाघाये यांना डावलून काँग्रेस आपल्याला साकोलीचे तिकीट देणार नाही, याचा अंदाज त्यांना होता. तर लोकसभा निवडणूक त्यांची विधानसभेची लिटमस टेस्ट होती. मतदारसंघ बदलल्याने काय समीकरणे बदलली आहेत, साकोलीमधील किती जनमत आपल्या बाजूने याचा अंदाज त्यांना घ्यायचा होता. भाजपकडेही उमेदवारी मागायची झाल्यास त्यांना हे आकडे उपयोगाचे ठरणार होते.
जुलै 2009 मध्ये नानांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना साकोलीतून रिंगणात उतरले. तब्बल 62 हजारांच्या मताधिक्याने त्यांनी वाघाये यांचा पराभव केला. नाना पटोले यांना एक लाख 22 हजार तर सेवक वाघाये यांना 59 हजार मते मिळाली होती.मतदारसंघ बदलल्यानंतरही सलग तिसऱ्या निवडणुकीत पटोले यांचे लीड वाढले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. 2014 मध्ये भाजपने त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या हेवीवेट प्रफुल्ल पटेल यांचा दीड लाख मतांनी पराभव करत नाना खासदार झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत नानांनी साकोलीमधून त्यांचे विश्वासू काशीवार लहानू यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणले.
दिल्लीच्या राजकारणात गेलेले नाना आता स्थिरावले असे वाटत असतानाच डिसेंबर 2017 ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर नाराज होत जाहीर टीका केली. शेतकरी आणि इतर मागासवर्गाच्या प्रश्नांवर खासदारकीचा आणि भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. तसेच 2019 मध्ये साकोली मतदारसंघातून त्यांना आमदारकीचे तिकिटही मिळाले. त्यावेळी सेवक वाघाये यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. तर भाजपने पटोले यांना इंगा दाखवायचाच असा पण करुन नागपूरच्या परिणय फुके यांना नानांविरोधात उभे केले. खरंतर फुके हे त्यावेळी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होते. इथले पालकमंत्रीही होते. सुरुवातीला फुके विरुद्ध पटोले यांच्या लढतीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा रंग मिळाला. पण फुके यांनी फडणवीसांच्या मदतीने वातावरण फिरवले. त्यात वाघाये जी मते घेतील ती पटोले यांनाच मिळणारी होती असा अंदाज होता. पण निकालात पटोले सहा हजार मतांनी विजयी झाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पटोले यांनी निवडणूक लढवावी अशी हायकमांडची इच्छा होती. पण त्यांनी प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळवून दिली. ज्या पडोळे यांचे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते ते भाजपची अजस्त्र यंत्रणा, सुनील मेंढे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांना कशी काय मात देऊ शकतील? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. नाना पटोले भाजपला मदत करत आहेत, असा आरोप करत वाघाये यांनीही दुसऱ्यांदा काँग्रेसचा हात सोडला. पण पटोलेंनी पडोळे यांना निवडून आणले. साकोलीमधून पडोळेंना 27 हजारांचे मताधिक्य मिळाले. आताच्या घडीला भंडाऱ्याचा खासदार काँग्रेसचा, साकोलीचा आमदार काँग्रेसचा, साकोली मतदारसंघातील पंचायत समिती, बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसकडे आहेत.
थोडक्यात साकोलीसह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पटोले यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अशा मतदारसंघात सध्या भाजपची उमेदवारासाठीची शोधमोहीम सुरु आहे. भाजपने नुकतेच परिणय फुके यांना दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर पाठवले आहे. त्यामुळे साकोलीतून स्थानिकच उमेदवार दिला जाईल, असे संकेत आहेत. कारण, स्थानिक उमेदवारच पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकतो, असे भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना वाटत असावे. आताच्या स्थितीमध्ये भाजपकडे इच्छुकांची लांबलचक यादी आहे. पण पटोले यांचे राजकीय वर्चस्व मोडीत काढण्याइतका प्रभावी नेता भाजपला अद्याप गवसलेला नाही.
मतदारसंघातील जातीय समीकरणेही महत्वाची ठरतात. इथला कुणबी समाज नाना पटोले आणि काँग्रेसोबत असतो तर तेली समाज भाजपसोबत असतो, असा अंदाज आहे. तेली समाजाची जवळपास 40 हजार मते आहेत. त्यामुळे तेली समाजातील नेते ब्रम्हानंद करंजेकर यांचे चिरंजीव आणि वैनगंगा बहूउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर हे भाजपकडून इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात विविध भेटीगाठींचे कार्यक्रम आखत तयारीही सुरु केली आहे. पण ते पटोले यांना कितपत फाईट देऊ शकतील याबाबत भाजपच्याच मनात शंका आहे. शेवटी कोणी नाहीच सापडले तर सेवक वाघाये यांनाच पक्षात घेऊन त्यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते, असा एक पर्याय असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात.
साकोली मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी 48 टक्के मतदार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था ही महत्त्वपूर्ण गोष्ट मतदार संघाच्या दृष्टीने महत्वाची आहे.मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने उद्योगांचे फारसे अस्तित्त्व नाही. राष्ट्रीय महामार्ग तसेच लगतच असलेले नागझिरा अभयारण्य पर्यटन क्षेत्र यामुळे इथे सुरवातीपासूनच वन्यप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी दिसून येते. मात्र आज पर्यटन वाढले असले तरी स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय महामार्गाजवळ भेल प्रकल्प आणला होता. या प्रकल्पासाठी भूमिपूजन होऊन तसेच हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित झालेली आहे. मात्र अजूनही प्रकल्प सुरु नाही. त्यामुळे स्थानिक संतप्त असून जमीन परत देण्याची मागणी आहे. अशा या हायप्रोफाईल मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार याकडे केवळ विदर्भाचेच नाही तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.