जळगावमध्ये काळ होता. आमदार म्हटलं की पक्ष कोणताही असा सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांचे नाव फिक्स असायचं. सुरेश जैन तब्बल 35 वर्ष शहराचे आमदार होते. या काळात सुरुवातीला काँग्रेसकडून (Congress) आणि नंतर कधी समाजवादी काँग्रेसकडून, कधी राष्ट्रवादीकडून (NCP) तर कधी शिवसेनेकडून (Shivsena) विधेनसभेवर निवडून गेले. जैन यांच्यासाठी पक्षाचं बंधन कधीच नव्हतं. त्यांचा थेट रेपो असायचा जळगावमधील मतदारांशी.
अशा सुरेश जैन यांना पराभूत करत 2014 मध्ये भाजपचे सुरेश भोळे (Suresh Bhole) आमदार झाले. जैन यांच्या जळगाव शहरावरील 35 वर्षांच्या वर्चस्वाला, सत्तेला सुरुंग लागला. भोळे यांना जायंट किलर म्हणून ओळखले गेले. अर्थात या विजयाचे प्रमुख कारण मोदी लाट होतीच. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपात जैन तुरुंगात गेल्याने भोळेंसाठी पुरक बनलेले वातावरण, त्यांनी तयार केलेले पक्षाचे संघटन, त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क, त्यांचे सामाजिक काम, ते स्वतः लेवा पाटील आणि लेवा पाटील समाजाचे मतदारसंघावर असलेल्या प्राबल्याचा भोळे यांना लाभ झाला. व्यापारी वर्गाशी असलेली मैत्री याचाही त्यांना विजयासाठी हातभार लागला होता.
पुढे जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आणि त्यांच्या पत्नी सीमा भोळे महापौर झाल्या. 2019 मध्ये जळगावकरांनी भोळे यांनाच निवडले. गत लोकसभेला आणि यंदाही भाजपला शहरातून भरघोस लीड मिळाले. त्यामुळे कधीतरी शिवसेनेचे, सुरेश जैन यांचे वर्चस्व असलेल्या शहरावर भाजपने एकहाती वर्चस्व तयार केले. यासाठी एकनाथ खडसे यांच्यापासून ते गिरीश महाजन, उन्मेष पाटील, रक्षा खडसे, स्मिता वाघ यांसारख्या वरच्या फळीतील नेत्यांपासून ते तळातील कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.
आता भाजपातर्फे भोळे तिसऱ्यांदा संधी दिली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी आमदार भोळे यांनी मुंबई दौरे वाढविले आहे. भाजपाकडे लेवा पाटील समाजाचा मोठा चेहरा म्हणून भोळेंकडे पाहिले जाते. त्यांच्या व्यतिरिक्त लेवा पाटील समाजातील दुसरा बडा नेता भाजपाकडे नाही. यामुळे भाजपा त्यांना पुन्हा संधी देईल, असे मानले जाते.
दुसरीकडे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील फॅक्टरमुळे भाजपा मराठा समाजातील उमेदवाराला रिंगणात उतरवले, अशीही अटकळ बांधली जात आहे. यामुळे मराठा समाजातील इच्छुकांनीही चाचपणी सुरु केली आहे. यात मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचे नाव आघाडीवर आहे. शहरातून भाजपातर्फे युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील आणि नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांचेही नाव चर्चेत आहे. सर्व इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढविल्याने भाजपाकडून तिकीट मिळविण्यासाठी सर्वांनीच जोर लावल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कुमकवत संघटन बघता महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटेल असे दिसते. अर्थात या पक्षाचेही संघटन मजबूत आहे असे नाही. लोकसभेला या पक्षाला सर्वच बुथवर यंत्रणाही लावता आली नव्हती. पण तरीही काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन चांगलेच म्हणायला हवे.
त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. दोघेही लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळे लोकसभेची उमेदवारी भाजपातून आयात उमेदवार करण पवार यांना मिळाली. आता विधानसभेसाठी जयश्री महाजन आणि कुलभुषण पाटील पुन्हा इच्छुक आहेत. मातोश्रीवरुन ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळेच आम्ही तयारी सुरु केल्याचे त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र तिकीट कुणाला मिळेल, याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल.