Download App

Letsupp Ground Zero : सुनील केदार यांचे ग्राऊंड उद्ध्वस्त होणार? भाजपचे तीन प्लेअर तयार!

सावनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या अनुजा केदार विरुद्ध भाजपचे मनोहर कुंभारे यांच्यात निवडणूक होणार?

सुनील छत्रपाल केदार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आमदारकी गमवावी लागली आणि सहा वर्षांसाठी ते अपात्रही ठरले. 1999 चा अपवाद वगळता केदार हेच सावनेरचे आमदार होते. हा मतदारसंघा ताब्यात घेण्यासाठी भाजपने अनेकदा जोर लावला. पण यश नव्हते. आता केदार (Sunil Kedar) अपात्र ठरल्याने रिंगणाबाहेर गेले आहेत. त्यामुळे भाजपला (BJP) सावनेरमध्ये संधी दिसू लागली आहे. यंदा सावनेरमध्ये कमळ फुलवायचेच हा चंग इथल्या भाजपच्या नेत्यांनी बांधला आहे. त्यासाठी चार प्लेअरही तयार झाले आहेत. पण लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) रामटेकमध्ये विजय मिळविल्याने अपात्र ठरल्यानंतरही केदार यांनी करिश्मा दाखवून दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सावनेरची लढत नक्कीच अवघड असणार आहे हे नक्की… (Anuja Kedar of Congress vs Manohar Kumbhare of BJP will be election in Savner Assembly Constituency)

याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्याला निवडूणक स्पेशल सिरीजमध्ये

सध्याच्या घडीला नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा आणि शहराची अलिखित वाटणी करुन घेतली आहे. यात शहराचे नेतृत्व करत आहेत आमदार नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे. तर ग्रामीण भागाचे नेतृत्व करत आहे ते सुनील केदार यांच्याकडे. केदार यांनी मागच्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या ग्रामीण भागात आपली मांड पक्की केली आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समित्या असोत, विधानसभा असो किंवा लोकसभा असो. त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न केले. रामटेकमध्ये तर मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पर्यायी उमेदवाराला निवडून आणण्यााच चमत्कार केदार यांनी केला.

हेच सुनील केदार 1995 पासून सावनेरचे आमदार आहेत. 1999 मध्ये अवघ्या चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. पण 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग चारवेळा ते सावनेरमधून निवडून आले. या दरम्यान, भाजपने सावनेर जिंकण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. 2009 मध्ये भाजपने अगदी थोडक्यात 2014 मध्ये मूळ उमेदवाराचा अर्ज बाद झाला. 2019 मध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना केदार यांच्याविरोधात उमेदवारी देत लढत प्रतिष्ठेची केली. पण केदार 20 हजारांचे मताधिक्य घेत आमदार झाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते राज्यात पुन्हा मंत्रीही झाले.

Nashik : लोकसभेला हवा फिरली… विधानसभेला नाशिक भाजपच्या हातून जाणार?

केदार यांचा हा वारु चौफेर असतानाच गतवर्षी नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात ते दोषी सापडले अन् आमदारकी गेली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ते दोषी सापडल्याने काँग्रेसच्या चिंता वाढल्या होत्या. पण केदार यांनी डॅमेज कंट्रोल करत रामटेकमध्ये दणदणीत विजय मिळविला. अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघातूनही त्यांनी काँग्रेसला लीड मिळवून दिले. यादरम्यान, केदार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्हीकडे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे ते आता निवडणूक लढवू शकणार नाहीत.

त्यामुळे सध्या सावनेरमध्ये केदार यांना पर्याय शोधण्याचे काम सुरु आहे. यात अनुजा केदार यांचे नाव अग्रस्थानी आहे. केदार यांच्याच घरात उमेदवारी द्यायची असा पक्षाचा निर्णय झाल्यास त्यांच्याच पत्नी अनुजा केदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. अन्यथा रविंद्र चिखले, बंडू चौधरी आणि बाबा कोडे ही तीन नावं सावरेनमधून चर्चेत आहेत. हे तिघे सुनील केदार यांचे विश्वासार्ह आहेत. त्यांच्या ग्रुपचे ट्रस्टी आहेत. या चौघांपैकीच कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळू शकते. थोडक्यात इथे उमेदवारी मिळेल ती सुनील केदार यांच्याच विश्वासातील व्यक्तीला.

पण केदार प्रत्यक्ष रिंगणात नसल्याने इथून भाजपला संधी दिसू लागली आहे. भाजपकडून इथे सगळ्यात आघाडीवर नाव आहे ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे. केदार यांचे राईट हँन्ड अशी ओळख असलेले कुंभारे ऐन लोकसभेपूर्वी भाजपमध्ये आले. अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण काँग्रेसचा हात सोडल्याचे म्हणत कुंभारे भाजपवासी झाले. लोकसभेच्या प्रचारावेळी कुंभारे यांनी बऱ्यापैकी मतांची पेरणी केली. गावोगावी दौरे केले. आताही ते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.

‘केज’साठी पवारांनी हेरला मुंडेंचाच शिलेदार; प्रवेशाची औपचारिकता बाकी?

दुसरे नाव आहे ते आशिष देशमुख यांचे. देशमुख यांनी 2009 मध्ये केदार यांना अक्षरशः घाम फोडला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत केदार अवघ्या चार हजार मतांनी विजयी झाले होते. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमध्ये आलेले देशमुख पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. सावनेर आणि काटोल अशा दोन्ही मतदारसंघात ते तयारी करत आहेत. केदार यांच्या विरोधात आंदोलन करुन त्यांनी सावनेरमध्ये निवडणुकीचा धुरळा उडवून दिला आहे. भाजपसमोर तिसरे नाव आहे ते डॉ. राजीव पोतदार यांचे. माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या पोतदार यांनी 2019 मध्ये केदार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. गत पाच वर्षात पोतदार यांनी मतदारसंघ पायाखालून घातला आहे. आपली तयारी दाखवत त्यांनी उमेदवारीवर पक्का दावा केला आहे. यातील आता नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us