लोकसभेला बीड (Beed Lok Sabha Constituncy) मतदारसंघात महायुतीला धक्का बसला. भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करत बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) खासदार झाले. यामध्ये शरद पवारांचं (Sharad Pawar) राजकारण सरस ठरलं. अजितदादांच्या शिलेदाराला गळाला लावून निवडून आणण्याची किमया पवारांनी साधली. आता याच पवार यांनी विधानसभेलाही बीडमध्ये फासे टाकायला सुरुवात केली आहे. त्यांनी बीडमधील बड्या नेत्यासाठी पक्षाची दारे खुली केल्याची माहिती आहे. पवार यांचे हे फासे यशस्वी ठरले तर पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय यांना सलग दुसरा धक्का असणार आहे… पवार यांनी नेमके काय फासे टाकले आहेत आणि कोण आहेत हे बडे नेते… (Former BJP MLA of kej Constituency Sangeeta Thombre will join Nationalist Sharad Chandra Pawar’s party?)
शरद पवार यांनी सोडून गेलेले आमदार किंवा चेहरा नसलेल्या मतदारसंघामध्ये नेतृत्व उभे करण्यावर भर दिला आहे. या रणनीतीमध्ये ते तिथले माजी आमदार, भाजपचे माजी आमदार, भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करत आहेत. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी. एस. पाटील, शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा-गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, चिपळूणमध्ये प्रशांत यादव, उदगीरमध्ये सुधाकर भालेराव यांना पक्षात घेतले आहे. आता केजच्या भाजपच्या माजी आमदार आणि पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या संगीता ठोंबरे शरद पवार यांच्या पक्षात येण्याची दाट शक्यता आहे.
ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. स्वत: संगीता ठोंबरे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आणि भाजपकडून तिकीट मिळण्याची कमी शक्यता यामुळे त्यांनी धक्का देणारा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको. संगीता ठोंबरे यांनी अजून तरी तसा निर्णय घेतलेला नाही. पण, सध्याची मतदारसंघातील परिस्थिती त्यांच्यासाठी प्रतिकूल बनली आहे. त्यामुळे जर त्यांनी असा निर्णय घेतला तर मुंडे भावंडांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. मांजरा धरण पाणीप्रश्न, एमआयडीसी, सूत गिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि अंबाजोगाई जिल्हा निर्मिती असे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी मतदारसंघातील शंभरपेक्षा जास्त गावांचा दौरा केला आहे.
संगीता ठोंबरे यांनी भाजप दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात 2012 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. 2012 मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पृथ्वीराज साठे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पण पुढे दोनच वर्षांनी नमिता मुंदडा यांचा पराभव करुन त्या आमदार झाल्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची ओळख आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी कामांच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला.
पुढे 2019 मध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता मुंदडा यांनीच तिकीट जाहीर झाल्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर संगीता ठोंबरे यांना डावलण्यात आलं. आता विधानसभा निवडणुकीतही संगीता ठोंबरे यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण पक्षाकडून पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांनाच संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संगीता ठोंबरेंना अन्य पक्षात प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. शरद पवार गटाने जर त्यांना तिकीट दिलं तर केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा सामना होण्याची दाट शक्यता आहे.
केजच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सून आहेत. उच्च शिक्षित आणि चांगला जनसंपर्क ही त्यांची खास ओळख. पण नजीकच्या काळात पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून नवी ओळख निर्माण करण्यातही त्या यशस्वी ठरल्या आहेत. बीडच्या राजकारणात मुंदडा घराण्याचा आजही दबदबा दिसून येतो. पण, बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे आणि मुंदडा यांच्यात कधीच पटलं नाही. त्यामुळे माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर ते बजरंग सोनवणे यांच्यासाठी फायद्याचंच ठरणार आहे. केज मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे. वंजारी समाजाची सुमारे 80 हजार मतं आहेत. एकगठ्ठा मते असल्याने येथे वंजारी समाजाची मते निर्णायक मानली जातात. अन्य समाजघटकांचीही लोकसंख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे केजची निवडणूक यंदा राज्यात गाजणार अशीच चिन्हे आतातरी दिसत आहेत