Pankaja Munde on Vaidyanath Bank Election : बीड जिल्ह्यातील परळी येथील (Election) वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम राहिलं आहे. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. या बँकेत 17 सदस्यीय संचालक मंडळ आहेत. यातील 13 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यात सर्व 13 जागा पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जिंकल्या आहेत.
या विजयानंतर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह संचालक मंडळ लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची समाधी असलेल्या गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. यावेळी बोलताना, माजी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, ‘बँकेचे पॅनल हे निश्चितच निवडून येणार होते हा आम्हाला विश्वास होता. जेव्हा वैद्यनाथ बँकेचा विषय येतो, सर्वसामान्य माणूस वैद्यनाथ बँकेचा खातेदार आहे. ही मुंडे साहेबांची बँक आहे हा एक विश्वास आहे. या विश्वासाच्या अनुषंगाने विजय निश्चित आमचा होणार असा विश्वास होता.
लातुरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण; मंत्री पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
या निवडणुकीकडे आम्ही पक्ष राजकारण म्हणून बघत नाही. विरोधात कोणत्या पक्षाचे लोक होते आणि काय अशा गोष्टीकडं न बघता वैद्यनाथ बँकेची निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक होती. निवडणुकीची टर्म दुसरी असली तरी, अनुभव मात्र तीन टमचा आला असेल म्हणायला हरकत नाही. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली हा जो चढता आलेख आहे असाच आम्ही ठेवू शकू मला विश्वास आहे असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांमध्ये विनोद सामत, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड यांचा समावेश आहे.