मामा-भाचे, बहीण-भाऊ, सख्खे भाऊ, वडिल-मुलगा एकाचवेळी आमदार

Mahrashtra Assembly: राज्याच्या विधानसभेत आणि विधानपरिषदेत एकमेंकाचे नातेवाईक असलेल्या आमदारांची भलीमोठी यादीच आहे.

  • Written By: Published:
Mahrashtra Assembly Mla Political Relations

Mahrashtra Assembly : राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये बलाढ्य राजकीय घराणे आहेत. ही घराणीच त्या जिल्ह्यांची सत्ता चालवतात. त्यांच्या घरातील व्यक्ती विधानसभा (Mahrashtra Assembly), लोकसभा, राज्यसभा असो किंवा विधानपरिषदेवर असते. राज्याच्या विधानसभेत आणि विधानपरिषदेत एकमेंकाचे नातेवाईक असलेल्या आमदारांची भलीमोठी यादीच आहे. त्यात कुणी कुणाचे बहिण-भाऊ तर कुणी चुलते-पुतणे, मावसभाऊ, मामा-भाचे, वडिल-मुलगा किंवा साडू अशा जोड्याच आहेत. यातील काहींचा पक्ष एकच आहे. तर काहीजण विरोधी पक्षात आणि काही जण सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीला वर्षपूर्ती झालीय, त्या पार्श्वभूमीवर ही यादीच पाहूया…(Mahrashtra Assembly mla Political relations)


संतोष दानवे अन् संजना जाधव तर मुंडे बहिण-भाऊ…

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि मुलगी दोघंही विधानसभेत आहेत. जालन्यातील भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे (Santosh Danve( हे निवडून आलेले आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. तर संतोष दानवे यांची बहीण संजना जाधव (Sanjana Jadhav) या कन्नड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्या शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत. तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) हे चुलत भावंडं हे विधिमंडळात आहेत. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या सदस्य आहेत.

कोकणातून सख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत…
उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि त्यांचे सख्ये बंधू किरण सामंत ही जोडी विधानसभेत आहे. दोघंही शिवसेनेचे आमदार आहेत. उदय सामंत रत्नागिरी, तर किरण सामंत राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर भाजपचे खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुलंही आमदार आहेत. नितेश राणे हे भाजपकडून, तर निलेश राणे शिवसेनेकडून आमदार आहेत. म्हणजेच कोकणातून दोन सख्या भावांच्या जोड्या विधानसभेत आहेत. त्यातील दोघं मंत्री आहेत.


महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन मावसभावांच्या जोड्याही…

आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई या मावसभावाची जोडी विधानसभेत आहे. आदित्य ठाकरे वरळीतून दोनदा निवडून आले आहेत. त्यांचे सख्ये मावसभाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आहेत. शिवसेनेचे ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील (Rahul Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे दोघं मावसभाऊ आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे ते भाचे आहेत.


विधानसभेत पवार चुलत्या-पुतण्याची जोडी…

उपमुख्यमंत्री अजित पवार अन् आमदार रोहित पवार ही चुलत्या अन् पुतण्याची जोडी विधानसभेत आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. हे दोघंही वेगवेगळ्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात.

महाराष्ट्र विधानसभेत सख्ये साडू…
महाराष्ट्राच्या विधानसभेत सख्ये साडूही आहेत. शरद पवार गटाचे जयंत पाटील अन् भाजपचे आमदार सत्यजीत देशमुख हे दोघे साडू आहेत. जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुका सख्ख्या बहिणी आहेत. देशमुख हे शिराळा मतदारसंघातून, तर जयंत पाटील इस्लामपूर-वाळवा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

ब्रेकिंग : अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; आता पुढचा ‘डाव’ फडणवीस खेळणार


विधिमंडळात वडील अन् मुलाच्या दोन जोड्या…

वडील विधानसभेत तर मुलगा विधानपरिषदेत, मुलगा विधानसभेत आणि वडील विधानपरिषदेत अशा दोन जोड्या राजकारणात आहेत. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. तर मुलगा आदित्य ठाकरे विधानसभेत आहेत. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाचे आमदार आहेत. तर त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे विधानपरिषदेत आहेत.


गणेश बीडकरांनी विकासकामांची यादीच ठेवली समोर; पुण्यात तब्बल 50 कोटींची विकासकामे सुरू


जावई-सासऱ्यांची जोडी विधानसभेत होती पण…

राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले, त्यांचे जावई अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप ही जावई-सासऱ्यांची जोडी विधानसभेत होती. पण कर्डिले यांच्या निधनामुळं ही जोडी फुटली आहे.


दिलीप वळसे पाटलांच्या मेव्हण्याची पत्नी विधानसभेत

सगेसोयऱ्यांमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मेव्हण्याची पत्नी सई प्रकाश डहाकेही विधानसभेत आहेत. त्या भाजपच्या वाशिम जिल्ह्यातील करंजा मतदारसंघाच्या आमदार आहेत.


विधानभवनात दीर-भावजयीची जोडी…

विधानसभेत भावजयी आणि विधानपरिषदेत दीर अशी एक राजकीय जोडी आहे. शेवगाव पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचे मावसदीर सत्यजित तांबे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.


विधानसभेत मामा-भाच्याची दमदार जोडी

महाराष्ट्राच्या विधानसभेत मामा-भाच्यांची दमदार जोडी आहे. धाराशिव मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे भाचे अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अभिजित पाटील हे शरद पवार गटाकडून पहिल्यांदा आमदार झाले आहेत. तर कैलास पाटील हे दुसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत.

follow us