इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवरील हल्ल्यानंतर तणाव वाढला; भारतात तेल-गॅस दर वाढण्याची शक्यता
इराणच्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर संयुक्त हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oil and gas prices likely to increase in India : मध्यपूर्वेत तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून इस्रायल आणि अमेरिका यांनी बुधवारी इराणच्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर संयुक्त हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यानंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया देत खाडी क्षेत्रातील ताल आणि गॅस प्रकल्पांवर मोठे हल्ले करण्याची धमकी दिली आहे.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने या हल्ल्याची पुष्टी करताना सांगितले की, साऊथ पार्स गॅस फिल्डमधील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी स्फोट झाले असून आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असून कच्च्या तेलच्य किमतींनी झपाट्याने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 110 डॉलरच्या जवळ पोहोचली, जी मागील काही दिवसांच्या तुलनेत 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आहे. याशिवाय, युरोपियन गॅस दरात देखील सुमारे 6 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.
बारामतीत बिनविरोधची चर्चा संपली! विजय वडेट्टीवार यांचा इशारा, राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस उतरणार मैदानात
दरम्यान, इराणने स्पष्ट इशारा देत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतारमधील पाच महत्वाच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष करण्याची धमकी दिली आहे. संभाव्य लक्ष्यांमध्ये सौदी अरेबियातील SAMREF रिफायनरी आणि जुबैल पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, यूएईमधील अल होसन गॅस फिल्ड तसेच कतारमधील रास लाफान आणि मेसईद पेट्रोकेमिकल प्रकल्पांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. साऊथ पार्स गॅस फिल्ड हे जगातील सर्वात मोठे गॅस साठे मानले जाते आणि ते इराणच्या बुशेहर प्रांताजवळ स्थित आहे. या फिल्डमध्ये कतारची देखील भागीदारी आहे. त्यामुळे या हल्ल्यामुळे कतारने देखील इस्रायल आणि अमेरिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
या हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. साऊथ पार्स फिल्ड हे नॉर्थ डोम-साऊथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्याचा भाग असून जागतिक गॅस पुरवठ्याचा कणा मानला जातो. येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होतो. या पार्श्वभूमीवर, या घटनेचा भारतावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गॅस गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे. कतारमधील उत्पादनात अडथळे आणि स्ट्रेट ऑफ होर्मूझमधील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भारत दरवर्षी 1.4 कोटी टनांहून अधिक एलएनजी आयात करतो, तर एलपीजीपैकी सुमारे 80 ते 85 टक्के पुरवठा गल्फ देशांकडून होतो. त्यामुळे या भागातील तणाव वाढल्यास भारतात तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची तसेच पुरवठा संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, मध्यपूर्वेतील या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाले असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.