भूतानमध्ये हिमनदीचे सरोवर फुटून जलप्रलय, रस्ते वाहून गेले, भारतातील सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुराच्या पाण्याने भूतानमधील प्रसिद्ध गासा त्साचू गरम पाण्याचे झरे पूर्णपणे जलमय झाले असून, परिसरातील सुविधांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 30T163809.920

Floods as glacial lake bursts in Bhutan : भूतानमध्ये गुरुवारी रात्री उशिरा शिंताफू हिमनदीचे सरोवर फुटल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. या घटनेनंतर आलेल्या पुराच्या पाण्याने भूतानमधील प्रसिद्ध गासा त्साचू गरम पाण्याचे झरे पूर्णपणे जलमय झाले असून, परिसरातील सुविधांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर पुनाखा गासा महामार्गाचा काही भाग वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने, अद्याप या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाल्याची म्हहिती समोर आलेली नाही.

या पुराचा संभाव्य परिणाम भारतातील सीमावर्ती भागांवर देखील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वारा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दहा हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत शिबिरांमध्ये हलवले आहे. रात्रीच्या वेळी सायरन वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले, तसेच तातडीने घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत.

नेमका पूर कसा आला, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी भूतानमधील गासा जिल्ह्यातील लाया गेओग परिसरातील लुंगो येथील शिंताफू त्शो तलावातून पाणी ओसंडून वाहू लागले. हा तलाव वाकिला पर्वताच्या पायथ्याशी, मो छू नदीच्या खोऱ्याच्या वरच्या भागात आहे. विशेष म्हणजे, भूतानमधील संभाव्य धोकादायक ठरू शकणाऱ्या 17 हिमनदी तलावांपैकी या तलावाचा समावेश आहे. तलावातून बाहेर पडलेले पाणी मो छू नदीच्या पाणलोट क्षेत्रातून वेगाने पुढे सरकले.

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता, चमोलीत क्रॅश झाल्याचा संशय, 5 प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू!

रात्री सुमारे 8 वाजून 15 मिनिटांनी पुराचे पाणी ताक्तसेमाखांग परिसरात पोहोचले. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, गासा त्साचू गरम पाण्याच्या झऱ्याजवळील सुविधा पाण्याखाली गेल्या. गावांमध्ये पाणी शिरले, तर महामार्गावर झाडे, दगड, माती आणि चिखल वाहून आल्याने रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, या हिमनदी तलावातून बाहेर पडलेले पाणी नद्यांच्या माध्यमातून भारतात पोहोचण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे. सुरुवातीला हे पाणी भूतानमधील मो छू नदीतून वाहणार असून, पुढे मो छू आणि फो छू या नद्यांचा संगम होऊन पुनात्सांगछू नदी तयार होते. ही नदी दक्षिणेकडे वाहत भारतात प्रवेश करते. भारतात या नदीला संकोश नदी म्हणून ओळखले जाते.

संकोश नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी, तसेच आसाममधील कोकराझार आणि धुबरी जिल्ह्यांतील सखल भागांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. पुढे ही नदी आसाममधील ब्रह्मपुत्र नदीला जाऊन मिळते. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि आसाममधील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अलीपुरद्वार आणि जलपाईगुडीसह आसाममधील धुबरी आणि नदीकिनारी असलेल्या संवेदनशील भागांमध्ये खबरदारी घेतली जात आहे.

पुण्यात बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सारसबाग परिसरात दोन दिवसांपासून उभी होती कार

सीमावर्ती भागातील दहा हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, संभाव्य पूरस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. भूतानमधील हिमनदी तलाव फुटल्याने निर्माण झालेल्या या पुराचा भारतातील नदीकाठच्या भागांवर किती परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us