Latur DCC Bank Election : निलंगेकर VS निलंगेकर, पुतण्या विजयी, काकी पराभूत ! अरविंद पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

Latur District Bank Election : अरविंद पाटील निलंगेकर यांनी काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव करत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Arvind Patil Nilagnekar

Latur District Bank Election Result 2026 : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Latur District Bank Election) निवडणुकीत काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळविला. 19 जागांपैकी 14 जागांवर सहकार पॅनलने विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले. भाजप नेते व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या परिवर्तन पॅनलला पाच जागा जिंकता आल्या. देशमुख कुटुंबाच्या ताब्यातून बँक हिसकाविण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकरांना रणनिती आखली होती. शेवटी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर आपले वर्चस्व राखले आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो निलंगा मतदारसंघातील निकाल. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर (Arvind Patil Nilangekar) यांनी आपल्याच काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव करत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला आहे. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निलंगा सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी परिवर्तन पॅनलकडून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर मैदानात होत्या. या प्रतिष्ठेच्या लढतीत अरविंद पाटील यांनी काकींचा पराभव करत विजय मिळवला. या विजयामुळे त्यांचा पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश झाला आहे.


ऋषिकेश कराड यांचाही विजय

परिवर्तन पॅनलकडून भाजप आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनीही विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक गोविंदपुरकर यांचा पराभव केला. त्यामुळे सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी परिवर्तन पॅनलनेही काही महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली.

धीरज देशमुखांसह सहकार पॅनलचे प्रमुख उमेदवार विजयी
दुसरीकडे, धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने निवडणुकीत मोठे यश मिळवले. धीरज देशमुख यांनी स्वतः विजय मिळवला. माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले यांनी उदगीर मतदारसंघातून विजय नोंदवला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव हेही विजयी झाले. मत्स्य व हाउसिंग मतदारसंघातून जयेश विश्वंभर माने यांनी 45 पैकी 35 मते मिळवत विजय मिळवला. तर उदगीर सोसायटी मतदारसंघातून प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी 10 मतांच्या फरकाने बाजी मारली. संतोष पाटील यांनीही विजय मिळवला.


सहकार पॅनलचे १४, तर परिवर्तन पॅनलचे ५ उमेदवार विजयी

या निवडणुकीत सहकार पॅनलचे हेमंत जाधव, प्रीती भोसले, आशिष पाटील राजूरकर, संतोष पाटील, धीरज देशमुख, जगन्नाथ पाटील, जयेश माने, सर्जेराव मोरे, विवेक सिरसाठ, अविनाश जाधव, शेषेराव हाके, चंद्रशेखर दंडीमे, शितल पाटील आणि गीतांजली लांडगे यांनी विजय मिळविला. तर परिवर्तन पॅनलकडून अरविंद पाटील निलंगेकर, अतुल गंभीरे, भगवानराव पाटील तळेगावकर, ऋषिकेश कराड आणि शोभा पवार हे पाच उमेदवार विजयी झालेत.

follow us