अजितदादांच्या त्या एका निर्णयाने अमित शहांनाही बसला होता धक्का; नेमकं काय घडलं होतं?, शहांनी सांगितला किस्सा
Amit Shah on Ajit Pawar : पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी अमित शहांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
Amit Shah on Ajit Pawar : पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात आज आणखी एका महत्त्वाच्या अध्यायाची नोंद झाली. (Pune) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्हा परिषद परिसरात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तर मुख्य प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा नामकरण व अनावरण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांच्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देताना शहा यांनी त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याचे विशेष कौतुक केले.
अजित पवार यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आपल्यालाही आश्चर्य वाटल्याची आठवण अमित शहा यांनी सांगितली. या निर्णयामुळे जनतेला मोठा धक्का बसू शकतो, मग इतका मोठा राजकीय निर्णय घेण्यामागचे कारण काय, अशी विचारणा आपण अजितदादांना केली होती. त्यावर प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या विकासासाठी महायुतीसोबत येणे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी महायुतीचा भाग व्हायचे असल्याची त्यांची भूमिका होती, असे शहा यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर त्यांच्याशी आपले नाते अधिक घट्ट झाल्याचे शहा म्हणाले. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी अजितदादांनी आपल्याशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठामपणे भूमिका मांडली. वरिष्ठ पदावर असतानाही स्वतःच्या राजकीय संबंधांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याला त्यांनी अधिक महत्त्व दिले. कार्यकर्त्यांसाठी लढण्याचा त्यांचा हा गुण इतर राजकीय नेत्यांनीही आत्मसात करण्यासारखा असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर सरकारला अधिक स्थिरता आणि सातत्य मिळाले. त्यामुळे अनेक कठोर निर्णय घेणे शक्य झाले आणि महाराष्ट्रातील सरकारची वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू राहिली, असेही शहा यांनी स्पष्ट केले. मात्र, अचानक झालेल्या अजित पवार यांच्या निधनाने आपण सर्वजण मोठ्या धक्क्यात गेल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यावेळी जखमींच्या बचावाची शक्यता कमी असल्याचे समजताच मन सुन्न झाले, अशी आठवण त्यांनी सांगितली.
अपघातानंतर अवघ्या पाऊण तासात अजित पवार यांच्या निधनाची अधिकृत माहिती मिळाली आणि एका कार्यक्षम नेत्याला महाराष्ट्राने गमावल्याची जाणीव झाली, असे अमित शहा म्हणाले. वेळेच्या आधीच काम करणारा माणूस आपल्यातून निघून जाणे हे राज्याचे मोठे नुकसान आहे. अजितदादा हे केवळ काम करणारे नेते नव्हते, तर कामाला शिस्त आणि वेळेचे बंधन घालणारी त्यांची स्वतंत्र कार्यपद्धती होती. त्यांच्या अकाली जाण्याची खंत सर्वांनाच कायम राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
अजित पवार यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीत निर्माण केलेली कामाची पद्धत आगामी काळात तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. वेळेचे नियोजन, शिस्त, निर्णयक्षमता आणि कामाचा ध्यास या गुणांमुळे अजितदादांची ओळख कायम राहील. त्यांच्या कार्यशैलीतून नव्या पिढीला शिकण्यासारखे खूप काही आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देणे आणि पुतळ्याचे अनावरण करणे हा त्यांच्या कार्याचा आणि स्मृतींचा सन्मान असल्याचे अमित शहा यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
तीन बडे नेते, 45 मिनिटांची बैठक आणि अनेक राजकीय मुद्दे! अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात नेमकं काय घडलं?