ठाकरे बंधू मुंबईनंतर ‘या’ चार महापालिकेत एकत्र येणार; लवकरच होणार मोठी घोषणा
Shiv Sena UBT MNS Alliance : राज्यात 29 महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय
Shiv Sena UBT MNS Alliance : राज्यात 29 महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आघाडी आणि युतीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, ठाकरे बंधू विदर्भात देखील एकत्र महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे.
पुणे, नाशिक, ठाणे आणि मुंबईनंतर ठाकरे बंधू आता विदर्भातील आणखी चार महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहे. अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे बंधू 29 पैकी 8 महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढवणार आहे. विदर्भातील चारही महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र लढवणार असल्याची माहिती मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळेल असं माध्यमांशी बोलताना राजू उंबरकर म्हणाले.
तर दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी लवकरच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये झालेल्या जागावाटपाबाबत माहिती देण्यात येणार आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून जागावाटपावर चर्चा सुरु असून मीडिया रिपोर्टनुसार, मनसे मुंबईत 70 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणार आहे. ज्याठिकाणी उमेदवार जिंकण्याची संधी आहे त्याच जागांवर मनसे दावा ठोकणार अशी देखील माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत मनसे किती जागांवर उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
