राष्ट्रवादीचे विलीनीकरण : अजितदादांनी मला सांगितले असते; फडणवीस यांनी टोचली टाचणी
विलीनीकरणाची माहिती आम्हाला दिली गेली असती.' शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही.
Devendra Fadnavis reveals everything about NCP merger talks : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
अजित पवार जिवंत असते तर येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले असते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून केला जात आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीही अजित पवार आणि माझ्यात या संदर्भात चर्चा झाली होती, असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांनी देखील विलीनीकरणासाठी अनेक बैठका झाल्याची माहिती दिली असून, लवकरच अधिकृत घोषणा होणार होती, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी हे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे.
दरम्यान, या कथित विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय ते स्वतः घेतात. आम्ही त्यांचे मित्र आहोत आणि ते आमच्या सोबत सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत.’ शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘जर विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती, तर अजितदादांनी आम्हाला नक्की सांगितले असते. ते सरकारमध्ये होते. आमच्याशी चर्चा न करता असा मोठा निर्णय होऊ शकतो का? विलीनीकरणाची तारीख ठरली असती, तर त्याची माहिती आम्हाला दिली गेली असती.’ शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली का? वाऱ्यासारख्या वृत्ताला अखेर पूर्णविराम
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांनी या विषयावर मोठा खुलासा केला आहे. एका चर्चेदरम्यान ते म्हणाले, ‘अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक आणि ठोस चर्चा झाली होती. महापालिका निवडणुकीनंतर विलीनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब होणार होते.’ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांनीही 12 फेब्रुवारी 2026 ही विलीनीकरणाची संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली असल्याची पुष्टी केली होती. तसेच, 17 जानेवारी 2026 रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या संदर्भात सविस्तर बैठक झाली होती. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया सध्या थांबली आहे. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली असून, राष्ट्रवादी पक्षाची पुढील दिशा काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
