2019 नंतर काहींचे फोन थांबले ते थांबलेच; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Uddhav Thackeray Fadnavis : संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने फडणवीसांसोबतच्या जुन्या संवादाची चर्चा.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 31T202554.796

Uddhav Thackeray Fadnavis : काही जणांचे फोन 2019 नंतर बंद झाले, (Modi) ते पुन्हा सुरू झालेच नाहीत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला. खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशन झाले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या जुन्या विधानाला मिश्कील प्रत्युत्तर दिले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मंचावर उपस्थित होते.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ या पुस्तकाचे 29 ऑक्टोबर रोजी प्रकाशन झाले होते. या सोहळ्याला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी 2019 पर्यंत उद्धव ठाकरे यांनी जेव्हा फोन केला, तेव्हा आपण प्रत्येक वेळी गेलो; मात्र त्यानंतर त्यांनी बोलावलेच नाही, असे म्हणत मिश्कील टिप्पणी केली होती. याच विधानाचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उत्तर दिले.

मोदी माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का?; संजय राऊतांच्या वक्तव्याने बोध कीर्तनची चर्चा

भाषणात उद्धव ठाकरे यांनी वाचनाचे महत्त्व सांगतानाच संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित काही आठवणीही सांगितल्या. ‘सामना’मध्ये काही गडबड झाली की आपण संजय राऊत यांना फोन करायचो; तोपर्यंत बाळासाहेबांचा राग शांत झालेला असायचा, असा किस्सा त्यांनी सांगितला. कोणाला ओव्या द्यायच्या आणि कोणाला शिव्या द्यायच्या, हे संजय राऊतांना चांगले कळते, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. आजकाल लेखन आणि वाचन कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत, सध्याच्या पिढीला काही हवे असेल तर चॅटजीपीटीचा आधार घेतला जातो, असेही ते म्हणाले.

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फोनचा उल्लेख करत, काही जणांचे फोन थांबले आणि काही जणांचे 2019 नंतर बंद झाले ते पुन्हा सुरूच झाले नाहीत, असे म्हणत फडणवीसांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनीही भाषण केले. त्यांनी कोणतेही थेट राजकीय भाष्य न करता आपल्या खास खुमासदार शैलीत संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित काही आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.

follow us