‘त्या’ व्यक्तीला भगोडा म्हणणं पटत नाही; पुस्तक प्रकाशनापूर्वीच संजय राऊतांच्या विधानाने नवा वाद
Sanjay Raut on Vijay Mallya : विजय माल्या यांच्या देश सोडण्यामागच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत संजय राऊत मोठं विधान केलं.
Sanjay Raut on Vijay Mallya : विजय मल्ल्या यांना भगोडा म्हणणं मला पटत नाही, असं विधान करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. आपल्या ‘बोध कीर्तन’ या 17 व्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी मल्ल्या (Sanjay Raut) यांच्यावरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले. इतर उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज माफ केली जातात, मग विजय मल्ल्या यांना काही सवलत का दिली नाही, असा सवाल राऊत यांनी केला. केवळ ते सरकारचे मित्र नव्हते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
विजय मल्ल्या हे उद्योगपती होते आणि त्यांनी कराच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत मोठं योगदान दिलं आहे, असं राऊत म्हणाले. मल्ल्या यांच्याशी आपली ओळख असून त्यांच्यासोबत अनेकदा जेवण आणि चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते खासदारही होते. त्यांना ज्या परिस्थितीत देश सोडावा लागला, त्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, असं मत राऊत यांनी मांडलं. जगात अनेक उद्योगपतींना अशा अडचणींचा सामना करावा लागला असल्याचं सांगताना त्यांनी दक्षिण सुदानमधील लॉरेन्स लॉल या उद्योगपतीचाही उल्लेख केला.
मल्ल्या यांनी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक व्याज भरल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा राऊत यांनी केला. दुसरीकडे, काही उद्योगपतींनी 50 हजार कोटी रुपयांची कर्ज घेतली, मात्र ते सरकारच्या जवळचे असल्याने त्यांना सवलत मिळाली, असा आरोप त्यांनी केला. उद्योगपतींच्या कर्जाबाबत बँकांनी त्यांच्याशी चर्चा करून पैसे वसूल करण्याचा मार्ग शोधायला हवा होता, असंही राऊत म्हणाले. शेतकऱ्यांनाही अशा प्रकारची कर्जमाफी मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
मल्ल्या यांची संपत्ती जप्त करण्यात आली असून ती कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक असल्याचा दावा राऊत यांनी केला. मल्ल्या यांनी जवळपास अडीच हजार कोटी रुपये भरले होते आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्यांना सवलत हवी होती, असं त्यांनी सांगितलं. मात्र, एखाद्या उद्योगपतीचा व्यवसाय बंद पाडायचा किंवा त्याला देश सोडण्यास भाग पाडायचं असेल, तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते, अशी टीका राऊत यांनी केली. जेट उद्योगसमूह आणि किंगफिशर एअरलाईन्स बंद पडल्याचाही उल्लेख करत, संबंधित उद्योगपती सरकारचे मित्र नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या आशयाबाबतही राऊत यांनी माहिती दिली. खासदार, राजकारणी किंवा नेता यापेक्षा लेखक आणि पत्रकार म्हणूनच आपली ओळख कायम राहावी, अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं 17 वं पुस्तक असून त्यात राजकारण आणि राजकीय टीका तुलनेने कमी आहे. पुस्तकात कविता, लहान कथा, सुविचार, केस स्टडी, तत्त्वज्ञान, मनातील भावना आणि असंतोष अशा विविध विषयांचा समावेश असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. आपल्या आवडत्या व्यक्ती, युद्ध आणि संवाद यांसह आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरही त्यांनी लिखाण केलं आहे.
या पुस्तकातील प्रकरणं छोटी असून वाचकांना कोणत्याही पानापासून पुस्तक वाचता येईल, असं राऊत यांनी सांगितलं. काही प्रकरणं केवळ एका ओळीची, तर काही दोन ओळींची आहेत. कीर्तनातून जसा बोध आणि आनंद मिळतो, तसाच अनुभव वाचकांना या पुस्तकातून मिळावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. राजकीय विषयांपेक्षा वेगवेगळे अनुभव, विचार आणि भावना मांडण्यावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे.