राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, पुढील काही महिन्यांत देशात मोठ्या घडामोडींचे भाकीत

Raj Thackeray Statement : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान पदाबद्दल केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 21T182549.770

Raj Thackeray Statement : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत देशातील लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि स्वायत्त संस्थांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. देशात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करतानाच पुढील दोन ते पाच महिन्यांत काहीतरी मोठे घडेल, असा दावा त्यांनी केला. संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या राजकीय बदलाच्या शक्यतेलाही राज ठाकरे यांनी दुजोरा दिला. सरकारकडून होत असलेल्या चुकांमुळे जनतेच्या मनातील नाराजी वाढत असून, येत्या काही वर्षांत लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी 2018 पासून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत असल्याचे सांगितले. यासाठी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊनही त्यांनी आपली भूमिका मांडली होती. मतदान केल्यानंतर आपले मत योग्य प्रकारे नोंदवले गेल्याचे समाधान मतदारांना मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. निवडणुकीत कोण जिंकले किंवा कोण हरले, हा वेगळा विषय आहे, मात्र मतदान प्रक्रियेवर लोकांचा विश्वास असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अनेक देशांत बॅलेट पेपरवर मतदान होत असल्याचे सांगत त्यांनी भारतातही ही पद्धत स्वीकारण्याची मागणी केली. मतमोजणीला चार दिवस लागले तरी हरकत नाही, निकाल लवकर जाहीर करण्याची घाई कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी आगामी काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली. संजय राऊत यांच्याशी आपले बोलणे झाले असून, पुढील दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठे घडू शकते, असे त्यांनी सांगितले. एपस्टिनशी संबंधित फोटो बाहेर आल्याचा उल्लेख करत आणखी काही गोष्टी समोर येतील, असेही ते म्हणाले. सरकारकडून चुका होत राहिल्या आणि परिस्थिती हाताळण्यात अपयश आले, तर जनतेचा असंतोष वाढू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. देशात दुष्काळाची परिस्थिती, अन्नधान्याची संभाव्य टंचाई आणि इतर आव्हाने सरकारसमोर उभी राहू शकतात. अशा परिस्थितीत काही काळ देशाला पंतप्रधानच नसल्यासारखी स्थिती निर्माण होईल, असे भाकीतही राज ठाकरे यांनी केले.

नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या नाराजीमागे केवळ परीक्षेचा विषय नसल्याचे म्हटले. तरुणांच्या मनात अनेक मुद्द्यांवर राग साचला असून, तो व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, असे त्यांचे म्हणणे होते. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलनात अराजकता निर्माण झाल्याचा आरोप फेटाळत त्यांनी भाजपला जुन्या आंदोलनांची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी काहीही केले नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी टीका करत पुढील वेळी भाजपनेही आंदोलनातील छायाचित्रे पाहावीत, असा टोला त्यांनी लगावला.

देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या स्थितीवरही राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमेरिकेत अभिनेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करतात, तरी त्यांच्यावर अशा प्रकारचे निर्बंध लादले जात नाहीत, असे त्यांनी म्हटले. शबीर भाटिया यांनी अदानी आणि मोदी यांच्याशी संबंधित विषयावर तयार केलेल्या माहितीपटाचा उल्लेख करत, तो हटवण्यास पोलिसांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मग प्रेक्षकांनी केवळ भाजपच्या समर्थनार्थ तयार केलेले चित्रपटच पाहायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वेगवेगळ्या विचारांचे चित्रपट लोकांना पाहू दिले पाहिजेत, असे सांगतानाच सत्तेत कोणीही कायम राहत नाही आणि बदल हा आवश्यक असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. काही प्रकरणांतील न्यायालयीन निर्णय आणि अटकेच्या कारवायांचा संदर्भ देत उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयांचा विचार करावा, असे ते म्हणाले. देशात खरोखर किती संस्था स्वतंत्रपणे काम करत आहेत आणि पत्रकारिता तरी स्वायत्त राहिली आहे का, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांनी सल्ला देताना 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपला सत्ता मिळाली, केवळ संघामुळे नाही, असे मत मांडले. सत्ता आपणच आणली, असा गैरसमज करून घेऊ नये, असे सांगत राज ठाकरे यांनी सत्तेचा अधिकार अखेर जनतेकडेच असल्याचे अधोरेखित केले.

follow us