उमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी बांधली लग्नगाठ; घटस्फोटानंतर तीन महिन्यांत नव्या आयुष्याला सुरुवात
Omar Abdullah Nidhi Razdan Marriage; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं.
Omar Abdullah Nidhi Razdan Marriage: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. शनिवारी (31 ऑक्टोबर) दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. उमर अब्दुल्ला यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘कालपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली’, असं म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी निधी राजदान यांनाही टॅग केलं आहे. निधी यांनीही अंगठीचा इमोजी शेअर करत ‘It’s done bro’ अशी प्रतिक्रियाही दिली.
पहिल्या पत्नीपासून घटस्फोटानंतर तीन महिन्यांत दुसरं लग्न
उमर अब्दुल्ला यांनी पहिली पत्नी पायल अब्दुल्ला यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन महिन्यांत दुसरं लग्न केलं आहे. 31 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला होता. दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यायालयाने विशेष अधिकारांचा वापर करून त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं.
विमल जाहिरात प्रकरणी अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंनी दिली महत्त्वाची माहिती
याआधी उमर अब्दुल्ला यांनी घटस्फोटासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तिथे त्यांना घटस्फोट मंजूर झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांनी आपापसातील वाद मिटवून एकमेकांविरोधातील खटले मागे घेण्याची तयारी दर्शवली होती.
1994 मध्ये झालं होतं पहिलं लग्न
उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचं लग्न 1 सप्टेंबर 1994 रोजी झालं होतं. दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. त्यांना झहीर आणि जमीर अशी दोन मुलं आहेत.
दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर 2009 पासून ते वेगवेगळे राहत होते. 2011 मध्ये उमर अब्दुल्ला यांनी आपण पत्नीपासून वेगळे राहत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या घटस्फोटाचा विषय न्यायालयात सुरू होता.
महिलेच्या घरात घुसला, बंदूक काढली अन्…वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर गुन्हा
आता पहिला विवाह संपुष्टात आल्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी निधी राजदान यांच्याशी लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.