महिलेच्या घरात घुसला, बंदूक काढली अन्…वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर गुन्हा

Sushil Karad Case : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापुरात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 31T155530.992

Sushil Karad Case : सोलापुरात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग करणे आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुशील कराडसह अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर यांच्याविरोधात एकूण १४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सुशील कराड याच्याविरोधात यापूर्वीही गंभीर आरोप झाले होते. काही महिन्यांपूर्वी मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि त्याच्या मुलीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही त्याच्यावर होता. आता सोलापूरमधील नव्या प्रकरणामुळे सुशील कराड पुन्हा चर्चेत आला असून, त्याच्याविरोधातील तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याचे समोर आले आहे.

दुसऱ्याच्या डिग्रीवर स्वतःचं नाव, बीडमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १८ तासांच्या तपासानंतर अटक

पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांनी पीडित महिला, तिचा पती आणि मुलीच्या घरात घुसून त्यांना धमकावले व मारहाण केली. त्यांच्या नावावर असलेला प्लॉट आणि सोने धमकी देऊन ताब्यात घेतल्याचाही आरोप आहे. याशिवाय पीडितेची वाहनेही स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा कथित प्रकार २०२४ मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पीडित महिलेने न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुमारे दोन वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर सुशील कराडविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. महिलेच्या घरात घुसून धमकी देणे, बंदुकीचा वापर करून दहशत निर्माण करणे, विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या गुन्ह्यामुळे सुशील कराडच्या अडचणी वाढल्या असून, तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणींतही भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

follow us