नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा भव्य प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण
Nashik Simhastha Kumbh Mela : राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण आणि आखाड्यांच्या महंतांच्या उपस्थिती सिंहस्थ कुंभपर्वाच्या प्रारंभ.
Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वाला शनिवारी (31 ऑक्टोबर) धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. नाशिकमधील रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य धर्मध्वजारोहण करण्यात आले. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी झालेल्या या सोहळ्यावेळी टाळ्यांचा कडकडाट आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने गोदाकाठ परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, 13 आखाड्यांचे महंत, संत-महंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणापूर्वी राष्ट्रपतींनी गंगा-गोदावरी मंदिरात दर्शन घेतले तसेच रामकुंडावर पूजन केले. कुंभपर्वाच्या प्रारंभाचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो नाशिककर गोदाकाठी उपस्थित होते. मंदिर परिसर आणि गोदावरी घाटावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. रामकुंडावर उभारण्यात आलेला मुख्य धर्मध्वज स्तंभही या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला. 51 फूट उंचीचा हा स्तंभ पंचधातूपासून तयार करण्यात आला आहे.
या धर्मध्वज स्तंभावर समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या 14 रत्नांची प्रतीके साकारण्यात आली आहेत. अमृतकलश धारण केलेला गरुड, सिंह, सूर्य आणि चंद्र यांसारखी धार्मिक प्रतीकेही त्यावर कोरण्यात आली आहेत. मुख्य धर्मध्वजाच्या एका बाजूला बृहस्पतीचे वाहन असलेला सिंह, तर दुसऱ्या बाजूला अमृतकलशाचे प्रतीक दाखवण्यात आले आहे. या प्रतीकांमधून शौर्य, अमरत्व आणि गोदामातेच्या पावित्र्याचा संदेश दिला जात असल्याचे सांगितले जाते. गंगा-गोदावरी माता मंदिराजवळही 31 फूट उंचीचा स्वतंत्र पंचधातूचा धर्मध्वज उभारण्यात आला आहे.
नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथेही सिंहस्थ कुंभपर्वाच्या प्रारंभानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तेथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन मंदिरात दर्शन घेणार असून, कुशावर्त तीर्थावरील ध्वजस्तंभाचे पूजनही त्यांच्या कार्यक्रमात समाविष्ट आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभपर्वाचे धार्मिक विधी पार पडत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
या कुंभमेळ्याची धार्मिक परंपरा इतर कुंभमेळ्यांपेक्षा वेगळी आहे. नाशिकमधील रामकुंडावर वैष्णव आखाड्यांचे, तर त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर शैव आखाड्यांचे प्रमुख स्नानविधी पार पडतात. दोन्ही ठिकाणच्या धार्मिक परंपरा स्वतंत्र असल्या तरी सिंहस्थ कुंभपर्वाच्या आयोजनासाठी 13 आखाड्यांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. ध्वजारोहणाने कुंभपर्वाच्या धार्मिक कालखंडाला सुरुवात झाली असली, तरी मुख्य अमृतस्नानाचे सोहळे 2027 मध्ये होणार आहेत. पहिला प्रमुख अमृतस्नान सोहळा 2 ऑगस्ट 2027 रोजी, तर दुसरा 31 ऑगस्ट रोजी नियोजित आहे.
या धार्मिक सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, नदीघाटांचा विकास, भाविकांसाठी निवास आणि गर्दी नियंत्रण यांसारख्या सुविधांवर भर दिला जात आहे. कुंभपर्वाच्या प्रारंभानिमित्त शनिवारी सायंकाळी रामकुंडावर सुमारे 6,500 आदिवासी बांधवांच्या सहभागातून महा गोदाआरतीचे आयोजनही करण्यात आले आहे. या उपक्रमातून विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ध्वजारोहणापासून सुरू झालेला हा धार्मिक कालखंड 24 जुलै 2028 पर्यंत चालणार असून, पुढील काळात देशभरातून लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभपर्व हे नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन क्षमतेचीही मोठी परीक्षा ठरणार आहे.