दुसऱ्याच्या डिग्रीवर स्वतःचं नाव, बीडमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १८ तासांच्या तपासानंतर अटक

Fake Doctor in Beed : डॉक्टर असल्याचा दावा करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या तरुणाचा बनावटपणा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 30T141843.440

Fake Doctor in Beed : बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका बनावट डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश दत्तात्रय कानडे असे या आरोपीचे नाव असून, तो संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या नावाखाली रुग्णांवर उपचार करत होता. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत पदवी किंवा वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र नसल्याचे तपासात उघड झाले. विशेष म्हणजे, या बनावट डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी संबंधित पथकाला तब्बल १८ तास तपासणी करावी लागली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैद्यकीय पात्रता नसलेल्या काही व्यक्तींकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी शासकीय पंच, वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माधव निमसे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांच्या पथकाने राजीव गांधी चौकातील संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटलवर छापा टाकला. यावेळी तेथील व्यक्तीने आपली ओळख डॉ. ऋषिकेश दत्तात्रय कानडे अशी करून दिली. मात्र, त्याच्याकडे वैद्यकीय पदवी आणि अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मागितले असता तो कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही.

पथकाने रुग्णालयातील कागदपत्रांची आणि भिंतीवर लावलेल्या प्रमाणपत्राची तपासणी केली असता त्यातील प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या व्यक्तीच्या पदवी प्रमाणपत्रावर स्वतःचे नाव टाकून ऋषिकेश कानडे याने डॉक्टर असल्याचे भासवले होते. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे तो रुग्णांवर उपचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कारवाईदरम्यान पथकाने विविध औषधांच्या बाटल्या, पांढऱ्या रंगाची पावडर असलेले प्लॅस्टिकचे पुडे, वैद्यकीय साहित्य आणि बनावट प्रमाणपत्र जप्त केले आहे.

या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश कानडे याचे वय अवघे २९ वर्षे आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना केवळ बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांवर उपचार करण्याचा प्रकार समोर आल्याने बीड शहरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय ज्ञान आणि अधिकृत पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून उपचार केले जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

follow us