बीडमध्ये किरकोळ वादातून गोळीबार; वाल्मिक कराड कनेक्शन?, वातावरण तापलं

घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पथकाने महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली.

News Photo   2026 08 12T170310.193

बीड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा (Beed) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ‘माझ्याकडे का पाहतोस?’ या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. इमामपूर रोडवरील सलीम पेट्रोल पंपाजवळ संशयित आरोपींनी चार राऊंड फायर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळं शहरातील अवैध शस्त्रांचा वापर आणि गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय 22, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) हे इमामपूर रोडवरील सलीम पेट्रोल पंप परिसरातून जात होते. त्यावेळी ‘माझ्याकडं का पाहतोस?’ या कारणावरून त्यांचा संशयित आरोपींशी वाद झाला. काही वेळातच या वादाला हिंसक वळण मिळाले. सफवान खान आणि त्याच्या साथीदारांनी कथितरित्या बंदुका काढून हवेत तसंच फिर्यादीच्या दिशेने चार राऊंड फायर केले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. गोळीबारात कोणालाही इजा झाली नसली तरी लाठ्या-काठ्यांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला.

बीडमध्ये खाद्यतेलाविरोधात एफडीएची मोठी कारवाई; 1.94 कोटींचे तेल जप्त, पाच परवाने निलंबित

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांचे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पथकाने महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, मुख्य आरोपी सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठबीड) यांच्यासह अन्य 6 ते 7 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 109, 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3) तसेच आर्म्स ॲक्टच्या कलम 3/25 अंतर्गत कारवाई केली असून, एका आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सफवान खान याच्याबाबत विविध माहिती समोर येत आहे. परिसरात त्याची दहशत असल्याचा दावा केला जात असून, तो वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता असल्याचेही सांगितले जात आहे. कराड यांच्या समर्थनार्थ त्याने यापूर्वी मोर्चा काढल्याची माहिती आहे. हातात पिस्तूल आणि अन्य शस्त्रे घेऊन रील तयार करणे तसेच वाहनांच्या ताफ्यासह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे प्रकारही त्याच्याकडून झाल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वीही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, मशिदीत घुसून चाकूने हल्ला केल्याचा आरोपही त्याच्यावर झालेला आहे. त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेने बीडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अवैध शस्त्रांच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

follow us