कौटुंबीक वाद पेटला अन् सावत्र मुलानं वडिलांवर झाडली गोळी, पाच जणांविरोधात गुन्हा

Beed Crime : बीडच्या गेवराईत कौटुंबीक वादातून सावत्र मुलानं वडिलांवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना घडली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 29T154435.443

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात (Beed) कौटुंबीक वादातून वडिलांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. संजय नगर परिसरात सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शेख मुसा यांच्या पहिल्या पत्नीसोबत आणि तिच्या मुलासोबत गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. याच वादातून काही जण त्यांच्या घराजवळ आल्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि परिस्थिती तणावाची बनली.

वाद वाढल्यानंतर पहिल्या पत्नीकडील मुलगा मंगेश धुराजी शिंदे यानं गावठी कट्टा काढून शेख मुसा यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी मुसा यांच्या गुडघ्याला लागल्यानं ते जखमी झाले. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीनं जखमी मुसा यांना गेवराईतील खासगी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाची आत्महत्या, 4 महिन्यांपूर्वी झाला होता जीवघेणा हल्ला

या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या माहितीनुसार, प्रकरणात एकुण पाच जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत यातील तिघांना ताब्यात घेतलं आहे. गोळीबार केल्याचा आरोप असलेला मंगेश शिंदे मात्र घटनेनंतर फरार झाला आहे.

मंगेश शिंदे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली असून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचं काम सुरू आहे. कौटुंबीक वादातून नेमका हा प्रकार कसा घडला, यासह घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील पुढील कारवाई तपासातून स्पष्ट होणार आहे.

follow us