अजितदादांच्या काळातच दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं होतं, अभिजीत पाटील यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Abhijeet Patil on NCP Merger : अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे निश्चित झालं होतं, आमदार अभिजीत पाटील यांचं वक्तव्य.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 13T212156.810

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या (NCP) चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, आता या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निश्चित झाले होते, असे त्यांनी म्हटले आहे. राजकारणामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेली दरी मिटून संपूर्ण कुटुंब एकत्र आले, तर आम्हाला आनंदच होईल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे.

अजितदादांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय झाला होता, असा दावा करत अभिजीत पाटील यांनी विलिनीकरणाच्या प्रक्रियेबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे संकेत दिले. या प्रक्रियेत आमची मतेही जाणून घेतली जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांची विलिनीकरणाबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांची भेट घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

दरम्यान, दिल्लीतील संसदेच्या परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातही बैठक झाल्याची माहिती आहे. एकापाठोपाठ झालेल्या या बैठकांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत पडद्यामागे नेमक्या कोणत्या घडामोडी सुरू आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. त्यातच सुनील तटकरे यांनी अजित पवार असते तर १२ फेब्रुवारीलाच विलिनीकरण झाले असते, असा दावा केला होता. आता अभिजीत पाटील यांनीही अजितदादांच्या काळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे निश्चित झाल्याचे म्हटल्याने या विषयाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि विलिनीकरणाबाबत पुढील निर्णय कधी घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us