मंदार रानडे यांची हत्या महाराष्ट्रासाठी लांछनास्पद; कपिल पाटील यांनी घेतली रानडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Mandar Ranade Murder Case: समाजवादी नेते कपिल पाटील यांनी इचलकरंजी येथे जाऊन मंदार रानडेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
Mandar Ranade Murder Case Kolhapur: आंतरजातीय प्रेमविवाह (Inter-Caste Marriage) लावून दिल्याच्या रागातून इचलकरंजीतील प्रसिद्ध पुरोहित आणि ज्योतिषी मंदार अजित रानडे (वय 35) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. या प्रकरणी बाबूसाहेब उर्फ दीपक अण्णा मगदूम (वय 45, रा. शिरदवाड) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, समाजवादी नेते कपिल पाटील (Kapil Patil) यांनी इचलकरंजी येथे जाऊन रानडे कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेवर संताप व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्रासाठी ही घटना लांछनास्पद असल्याचे म्हटले आहे.
एनव्हिडियाच्या सीईओंच्या कथित प्रेमप्रकरणाने जगभर खळबळ, कंपनीच्या बाजारमूल्याला मोठा फटका
मंदार रानडे यांचा मृतदेह 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मानकापूर शिवारात उसाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात वैयक्तिक सूडाच्या भावनेतून कट रचून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
‘दाभोळकर, पानसरेंनंतरचे तिसरे मोठे बलिदान’
या घटनेनंतर कपिल पाटील यांनी रानडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. मंदार रानडे यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून सामाजिक परिवर्तनाची गती रोखण्याचा प्रयत्न आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतरचे हे तिसरे मोठे बलिदान असल्याचे पाटील म्हणाले.
या घटनेची गंभीर दखल समाज आणि शासनाने घ्यायला हवी. रानडे कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राने उभे राहण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात आंतरजातीय विवाह लावून देण्यासाठी कोणताही पुरोहित पुढे येण्यास धजावणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पुरोहितांमध्ये भीतीचे वातावरण
या हत्येमुळे स्थानिक पुरोहित मंडळातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विवाहांना मदत केली तर आमचे काय होणार, असा सवाल मंडळाच्या एका प्रतिनिधीने उपस्थित केल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंदार रानडे यांची हत्या ही जितकी दुःखद, वेदनादायक आहे तितकीच ती महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. सामाजिक बदलाची गती अवरुद्ध करणारी आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या नंतरचं हे तिसरं मोठं बलिदान आहे. मंदार रानडे यांच्या या बलिदानाची दखल समाजाने, शासनाने आणि अवघ्या महाराष्ट्राने घ्यायला हवी. रानडे कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायला हवं. अन्यथा कोणताही पुरोहित अशा विवाहांच्या मदतीस धजावणार नाही.
स्थानिक पुरोहित मंडळाचे एक प्रतिनिधी म्हणाले, आमच्यात भीतीचं वातावरण आहे. अशा विवाहांना आम्ही कशी काय मदत करू? त्यांचा सवाल होता.
मंदार यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलं आहेत, ती एकटी पडली आहेत.
मंदार रानडे यांच्या पत्नीचं म्हणणं होतं, मुलांना करीन मोठं पण माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
या कुटुंबाला शासनाकडून मदत आणि न्याय मिळावा ही अपेक्षा.
– कपिल पाटील——–
आंतरजातीय प्रेमविवाह लावून दिल्याच्या रागातून इचलकरंजीतील प्रसिद्ध पुरोहित मंदार अजित रानडे (वय 35) यांची नुकतीच निर्घृण हत्या झाली.
आज समाजवादी नेते कपिल पाटील यांनी इचलकरंजी येथे रानडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सोबत राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, समाजसुधारक प्रबोधिनीचे संचालक ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी आणि मंदार यांचा जिवलग मित्र इरफान नदाफ यावेळी उपस्थित होते.
— Kapil Patil (@KapilHPatil) November 13, 2026
‘मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे’
मंदार रानडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. पतीच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. मुलांना मी मोठे करेन; मात्र माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना मंदार रानडे यांच्या पत्नीने व्यक्त केली. या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही कपिल पाटील यांनी केली.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला दिलासा; जायकवाडी प्रकल्पातून पहिले आवर्तन सुरू
यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राज्याध्यक्ष राजा कांदळकर, समाजसुधारक प्रबोधिनीचे संचालक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी तसेच मंदार रानडे यांचे जिवलग मित्र इरफान नदाफ उपस्थित होते.