एक चूक अन् जगभरात Microsoft ठप्प; क्लाउड आउटेजची 7 संभाव्य कारणं
Microsoft Outage 13 नोव्हेंबर 2026 चा दिवस टेक जगासाठी एका महाभयंकर स्वप्नासारखा ठरला. Outlook वर मेल उघडेना, Teams वर मीटिंग होईना अन्
Microsoft Outage Common Causes Behind Cloud Service Failure : एका क्षणात संगणक थिजले, लॅपटॉपचे स्क्रीन ब्लॅकआउट झाले आणि जगातील सर्वात मोठी टेक कंपनी मानली जाणारी ‘मायक्रोसॉफ्ट’ अचानक गुडघ्यावर आली! शुक्रवार म्हणजेच 13 नोव्हेंबर 2026 चा दिवस टेक जगासाठी एका महाभयंकर स्वप्नासारखा ठरला. ऑफिसचे महत्त्वाचे मेल पाठवणे असो, वा महत्त्वाची कॉर्पोरेट मीटिंग… जगभरात सर्व काही एकाच वेळी ठप्प झाले. Microsoft ने हे आऊटेज नेमकं का घडलं याबाबत कोणतेही ठोस कारणं दिलेलं नाही. पण, असं नेमकं काय घडलं की, Microsoft ते Outlook च्या सर्व्हिसेस जगभरात अचानक ठप्प झाल्या. या महा-आऊटजमागील नेमकी संभाव्य कारणं काय असावी? जाणून घेऊया…
1. चुकीचं कॉन्फिगरेशन
मोठ्या कंपन्यांचे हजारो सर्व्हर ऑटोमेटेड सिस्टीमच्या माध्यमातून नियंत्रित केले जातात. इंजिनिअर्सकडून एखाद्या सेटिंगमध्ये छोटीशी चूक झाली, तरी तिचा परिणाम अनेक सर्व्हर आणि सेवांवर होऊ शकतो. जुनी सेटिंग पुन्हा लागू करून समस्या सोडवावी लागते. मात्र, त्यासाठी वेळ जाऊ शकतो.
2. सॉफ्टवेअर अपडेटमधील त्रुटी
युजर्सना नवे फीचर्स देण्यासाठी कंपन्या सातत्याने सॉफ्टवेअर अपडेट करत असतात. मात्र, अपडेटमध्ये असलेला एखादा बग टेस्टिंगदरम्यान लक्षात येत नाही. लाखो लोक एकाच वेळी सेवा वापरू लागल्यानंतर ही त्रुटी समोर येऊ शकते. त्यामुळे अनेक सेवा अचानक बंद पडण्याची शक्यता असते.
3. DNS मधील बिघाड
DNS म्हणजे इंटरनेटमधील फोनबुक. एखादी वेबसाइट कुठल्या सर्व्हरवर आहे, याची माहिती DNS यंत्रणा देते. DNS मध्ये बिघाड झाला, तर सर्व्हर सुरू असूनही युजर्सना वेबसाइट उघडता येत नाही. चुकीच्या सेटिंग्ज, जास्त ट्रॅफिक किंवा DNS सर्व्हरमधील तांत्रिक दोष याला कारणीभूत ठरू शकतात.
4. Entra ID मधील समस्या
Microsoft Entra ID ही लॉगिन आणि युजरची ओळख पडताळणारी महत्त्वाची सेवा आहे. Outlook, Teams आणि SharePoint सारख्या प्लॅटफॉर्मवर लॉगिन करण्यासाठी तिची मदत घेतली जाते. या सिस्टीममध्ये बिघाड झाला, तर योग्य पासवर्ड टाकूनही युजर्सना अकाउंटमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेकांना संपूर्ण Microsoft सेवा बंद पडल्याचा अनुभव येतो.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
5. डेटा सेंटरमधील तांत्रिक बिघाड
क्लाउड सेवा चालवण्यासाठी मोठ्या डेटा सेंटरची गरज असते. या ठिकाणी हजारो सर्व्हर चोवीस तास कार्यरत असतात. त्यांना अखंड वीजपुरवठा आणि योग्य तापमान राखण्यासाठी कूलिंग सिस्टीम आवश्यक असते. वीजपुरवठा खंडित होणे, बॅकअप जनरेटरमध्ये बिघाड होणे किंवा कूलिंग सिस्टीम बंद पडणे यामुळे सेवा विस्कळीत होऊ शकतात.
6. नेटवर्कमधील अडथळे आणि DDoS हल्ले
कधी कधी सर्व्हर व्यवस्थित सुरू असतात. मात्र, नेटवर्कमधील बिघाडामुळे युजर्सना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याशिवाय DDoS हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट रिक्वेस्ट पाठवून सर्व्हरवर अतिरिक्त ताण निर्माण केला जातो. परिणामी, खऱ्या युजर्सना वेबसाइट किंवा अॅप वापरण्यात अडचणी येतात.
7. एका सिस्टीमवर अनेक सेवांची निर्भरता
क्लाउडमधील अनेक सेवा एकाच लॉगिन सिस्टीम, डेटाबेस किंवा स्टोरेजवर अवलंबून असतात. त्यामुळे या सामायिक सिस्टीमपैकी एखादी बंद पडली, तर तिच्यावर अवलंबून असलेल्या अनेक सेवा एकाच वेळी ठप्प होऊ शकतात. यालाच ‘कॅस्केडिंग फेल्युअर’ म्हटलं जातं. सेवा पूर्ववत होत असतानाही लाखो डिव्हाइसेस एकाच वेळी पुन्हा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अडचण आणखी वाढू शकते.
…तर असचं जग ठप्प होत राहिलं
एका क्षणात सर्वकाही सुरळीत करणाऱ्या क्लाउड तंत्रज्ञानाने जगाचे काम जितके सोपे केले आहे, तितकेच त्याचे धोकेही आता स्पष्ट होऊ लागले आहेत. ही घटना केवळ एका कंपनीची तांत्रिक अडचण नसून, संपूर्ण जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा इशारा आहे. जोपर्यंत टेक कंपन्या अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिक भक्कम बॅकअप आणि ‘मल्टी-क्लाउड’ स्ट्रॅटेजी तयार करत नाहीत, तोपर्यंत एक छोटीशी चूक संपूर्ण जगाला अशाच प्रकारे क्षणात ठप्प करत राहिलं हे यावरून अधोरेखित होत आहे.