Nvidia च्या हुआंग यांचा बाजार उठवणारा खरा मास्टमांईंड कांग वेई; अ‍ॅलिस केवळ मोहरा

Jensen Huang कांग वेई आणि जेन्सन हुआंग यांची ओळख जवळपास दशकभरापूर्वी झाली होती. वाचा Nvidia च्या चीन कनेक्शनची धक्कादायक कहाणी

  • Ninad K
  • Written By: Published:
Nvidia CEO Jensen Huang & Alice Huang Case

Nvidia CEO Jensen Huang & Alice Huang Case : जगातील सर्वात शक्तिशाली टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Nvidia चे माजी CEO जेनसन हुआंग सध्या जगभरात चर्चेत आहे ते त्यांच्या कथित अफेअरमुळे. पण, या प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हुआंग यांची ज्या महिलेशी कथित जवळीक निर्माण झाली, त्या महिलेची ओळख त्यांना करून दिली होती तिच्याच पतीने. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय आणि वाचलयं…

ज्या महिलेमुळे जेन्सन हुआंग यांना राजीनामा द्यावा लागला त्या महिलेचं नाव आहे अ‍ॅलिस हुआंग आणि तिच्या पतीचं नाव आहे कांग वेई. अमेरिकेतील The Wall Street Journal च्या वृत्तानुसार, कांग वेई आणि जेन्सन हुआंग यांची ओळख जवळपास दशकभरापूर्वी झाली होती. त्यानंतर कांगनेच अ‍ॅलिस आणि हुआंग यांची भेट घडवून आणली. विशेष म्हणजे, अ‍ॅलिस आणि जेन्सन हुआंग यांच्या कथित जवळिकीची माहिती कांगला होती. इतकंच नाही, तर तो त्यांच्या नात्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांसमोर विनोदही करायचा. अ‍ॅलिस ही जेनसन हुआंग यांची पर्सनल असिस्टंट असल्याचं तो सांगत असे.

अ‍ॅलिस अन् कांग यांचं अब्जावधींचं व्यावसायिक साम्राज्य

अ‍ॅलिस आणि कांग हे दोघेही केवळ सामाजिक संपर्कांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी चीन, सिंगापूर, तैवान आणि इतर बाजारपेठांमध्ये तंत्रज्ञान, गेमिंग, फार्मास्युटिकल्स आणि क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी शोधल्या. 2010 मध्ये कांगने Shanghai Hexi नावाची कंपनी स्थापन केली. पुढे 2016 पासून अ‍ॅलिस आणि कांग यांनी एकत्रितपणे या कंपनीचं कामकाज सांभाळण्यास सुरुवात केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी विविध तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. याच व्यावसायिक व्यवहारांदरम्यान कांगची ओळख जेन्सन हुआंग यांच्याशी झाल्याचे सांगितले जाते.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

मात्र, या व्यावसायिक प्रवासात वादही निर्माण झाले. 2018 मध्ये चीनच्या सिक्युरिटीज नियामकाने कांग आणि त्याच्या कंपनीला शेअरहोल्डिंगची माहिती न दिल्याच्या आणि इतर नियमभंगाच्या प्रकरणात दंड ठोठावला. त्यानंतर कांगने या निर्णयाला आव्हान दिलं होतं, मात्र नियामकाने कांग आणि त्यांच्या कंपनीचे आक्षेप फेटाळून लावले.

आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया….

अमेरिकेने 2022 पासून चीनला प्रगत AI चिप्सच्या विक्रीवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली. कारण या अत्याधुनिक चिप्सचा वापर चीनच्या लष्करी आणि पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानाला बळ देण्यासाठी होऊ शकतो, अशी अमेरिकेला भीती होती. अशा परिस्थितीत चीनमधील मोठ्या कंपन्यांना Nvidia च्या चिप्सवर आधारित संगणकीय क्षमता मिळवण्याची गरज होती. याच काळात अ‍ॅलिस आणि कांग यांनी क्लाऊड कम्प्युटिंग आणि AI डेटा सेंटरच्या व्यवसायात प्रवेश केला. 2023 मध्ये कांग आणि अ‍ॅलिस या जोडप्याने सिंगापूरमधील एका व्हिडिओ गेम कंपनीचा व्यवसाय ताब्यात घेतला. त्यानंतर या युनिटचं नाव बदलून Megaspeed International असं ठेवण्यात आलं. या कंपनीच्या संचालकपदी अ‍ॅलिस हुआंगची नोंद झाली.

The Wall Street Journal च्या रिपोर्टनुसार, चीनची दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाची मेगास्पीडच्या व्यवसाय उभारणीत महत्त्वाची भूमिका होती. अलिबाबाला चीनबाहेरील डेटा सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या Nvidia चिप्सच्या माध्यमातून संगणकीय क्षमता मिळवायची होती. त्यासाठी मेगास्पीडने अलिबाबाला आपला प्रमुख ग्राहक म्हणून Nvidia समोर सादर केल्याचा उल्लेख द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीला Nvidia च्या क्लाऊड पार्टनरच्या रूपात चिप्स मिळवण्यासाठी प्राधान्य मिळाल्याचा दावा करण्यात आलाय.

यानंतर कंपनीने मलेशियातील डेटा सेंटरमध्ये Nvidia चिप्सवर आधारित सर्व्हर बसवले आणि अलिबाबाला संगणकीय सेवा पुरवल्याचं वृत्त आहे. मात्र याच व्यवहारात आणखी एक गंभीर आरोप समोर आला. मेगास्पीडने Nvidia चिप्सवर आधारित काही सर्व्हर चीनमध्ये पाठवल्याचा संशय अमेरिकेतील तपास यंत्रणांना आहे. यामध्ये शांघाय स्थित Century Litong या क्लाऊड कम्प्युटिंग कंपनीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

2024 च्या अखेरीपासून जून 2025 पर्यंत त्यांनी शांघाय आणि सिंगापूरमधील गुंतवणूकदारांसमोर डेटा सेंटरचे अनेक प्रकल्प मांडले. यामध्ये आग्नेय आशियातील दोन आणि शांघायमधील एका प्रकल्पाचा समावेश होता. संभाव्य गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तीन वर्षांत गुंतवणुकीचे मूल्य तिप्पट होऊ शकतं, असा दावा केला होता. तसेच चीनमध्ये Nvidia चिप्स आणण्यासाठी आपल्याकडे मार्ग असल्याचंही त्यांनी सांगितल्याचा आरोप आहे.

तैवानमधील जेन्सन आणि ॲलिस यांची भेट

2024 ते 2025 या कालावधीत ॲलिस आणि जेन्सन हुआंग यांची अनेकदा भेट झाल्याचं सांगितलं जात. एवढेच नव्हे तर, मे 2025 मध्ये तैवानमध्ये एका डिनरच्या वेळी दोघे एकत्र असल्याचं स्थानिक माध्यमांनी टिपलं होतं. विशेष म्हणजे, या प्रसंगी जेन्सन हुआंग यांची मुलगी आनंदाने ॲलिस आणि जेन्सन हुआंग या दोघांचे फोटो काढत असल्याचंही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आता या प्रकरणाचा सर्वात मोठा परिणाम केवळ हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणार नाहीये तर, Nvidia च्या चीनमधील व्यवसायावर, अमेरिकेच्या निर्यात धोरणावर आणि जगातील AI स्पर्धेवरही याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे एका बाजूला वैयक्तिक संबंधांची गुंतागुंतीची कहाणी, दुसऱ्या बाजूला अब्जावधी डॉलर्सचा क्लाऊड कम्प्युटिंग व्यवसाय आणि तिसऱ्या बाजूला अमेरिका-चीनमधील तंत्रज्ञान युद्ध या तिन्ही गोष्टी एका धाग्याने जोडल्या गेल्या आहेत आणि त्या धाग्याचं नाव आहे Nvidia.

पण या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तो म्हणजे Nvidia च्या अत्याधुनिक AI चिप्स चीनपर्यंत पोहोचल्या असतील, तर त्यामागे केवळ व्यावसायिक व्यवहार होते की निर्यात निर्बंधांना चकवा देण्याची एखादी मोठी यंत्रणा काम करत होती? याचं उत्तर अमेरिकेतील आणि सिंगापूरमधील तपासातून समोर येऊ शकतं आणि म्हणूनच हे प्रकरण केवळ एका अब्जाधीशाच्या कथित अफेअरपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर, जागतिक तंत्रज्ञानाच्या सत्तासंघर्षातील एक महत्त्वाचं प्रकरण बनलं आहे.

follow us