“सुनील तटकरेंना व्हिलन ठरवलं जातंय…” विलीनीकरणाच्या चर्चेवर अदिती तटकरेंनी केली खंत व्यक्त!
Aditi Tatkare on NCP Mergerl: विलीनीकरणाच्या बाबतीत सुनील तटकरेंना व्हिलन ठरवले जात असल्याची टीका अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
Aditi Tatkare on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरे यांना जाणीवपूर्वक व्हिलन ठरवले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, लाडकी बहीण योजनेला दिवंगत नेते अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे नाव देण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नंदुरबार दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, सुनील तटकरे आणि अजित पवार यांची मैत्री काँग्रेसमध्ये असल्यापासूनची आहे. अजितदादांचे मित्र म्हणून सुनील तटकरे यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही ते अजितदादांच्या कुटुंबाप्रती आणि मैत्रीच्या नात्याने आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, विलीनीकरणाच्या चर्चेत त्यांनाच व्हिलन ठरवले जात असल्याचे पाहून मुलगी म्हणून खूप दुर्दैव वाटते, असे त्या म्हणाल्या.
विलीनीकरणाच्या निर्णयाबाबत बोलताना अदिती तटकरे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखवले. योग्य वेळ आल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विलीनीकरणाबाबत जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव देण्यास सकारात्मक
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देण्याच्या चर्चेवरही अदिती तटकरे यांनी भाष्य केले. या योजनेला अजितदादांचे नाव दिल्यास एक कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होईल, असे त्या म्हणाल्या. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.