सोनिया गांधींच्या पुस्तकाचे कौतुक की, काँग्रेसच्या एन्ट्रीपूर्वीचा ट्रेलर?; रोहित पवारांची धाडसी पोस्ट चर्चेत

Rohit Pawar राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत रोहित पवार यांची अस्वस्थता असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत.

  • Ninad K
  • Written By: Published:
Rohit Pawar Post On Sonia Gandhi

Rohit Pawar Post On Sonia Gandhi : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय समीकरणांची चर्चा रंगली असताना दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाचे कौतुक करत रोहित पवार यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला सलाम केला आहे. त्यामुळे रोहित पवार काँग्रेसच्या जवळ जात आहेत का? राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत त्यांची काही वेगळी भूमिका आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील संघर्ष, वैयक्तिक आयुष्यातील दुःख आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दाखवलेली जिद्द यांचा उल्लेख केला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी इटलीमधील आपले घर आणि परिचित जग मागे सोडून भारतात आलेल्या सोनिया गांधी यांनी अनेक संकटांचा सामना केला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येसारख्या वैयक्तिक दुःखांनंतरही त्यांनी स्वतःला सावरत सार्वजनिक जीवनात योगदान दिले. त्यांचा हा प्रवास केवळ राजकीय नसून संघर्ष, धैर्य आणि माणुसकीची कहाणी असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केले आहे.

अजित पवारांच्या अपघाताचा उल्लेख; सोनियांनी दिलेली साथही अधोरेखित

रोहित पवार यांच्या पोस्टमधील आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. या संदर्भात संसदेत सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या कठीण प्रसंगी सोनिया गांधी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. स्वतःच्या आयुष्यात अशाच दुःखद प्रसंगांना सामोरं गेलेल्या व्यक्तीलाच दुसऱ्याच्या वेदनेची तीव्रता इतक्या संवेदनशीलतेने समजू शकते, याची प्रचिती त्या भेटीत आल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवारांच्या पोस्टचे राजकीय अर्थ काय?

रोहित पवार यांनी सोनिया गांधींचे केलेले कौतुक केवळ एका पुस्तकापुरते मर्यादित नसून, त्यातून राजकीय संदेश दिला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान रोहित पवार यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या विलीनीकरणाच्या चर्चांवरून ते नाराज असल्याचे दावेही केले जात आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोअर कमिटीच्या सलग तीन बैठकांना ते अनुपस्थित होते.

रोहित पवार संभाव्य विलीनीकरणाबाबत अस्वस्थ आहेत का? सोनिया गांधी आणि काँग्रेसचे कौतुक करून ते पक्षातील नेत्यांना काही राजकीय संदेश देत आहेत का? भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण झाल्यास रोहित पवार काँग्रेसचा पर्याय निवडणार का? असे काही प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर?

रोहित पवार यांनी सोनिया गांधी यांचे केलेले कौतुक आणि त्याचवेळी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत घेतलेली भूमिका यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास पक्षाची विचारधारा, नेतृत्व आणि भाजपसोबतच्या राजकीय भूमिकेचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, रोहित पवार हे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे सातत्याने टीकाकार राहिले आहेत. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेला अपेक्षित महत्त्व मिळाले नाही, तर ते कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे लक्ष असेल.

एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या सोनिया गांधींबाबतच्या सकारात्मक भूमिकेने वेगळाच राजकीय संदर्भ निर्माण केला आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का, एकत्र आल्यास पक्षाची दिशा काय असेल आणि रोहित पवार यांची भूमिका काय राहणार, हे महत्त्वाचे प्रश्न असतील. त्यामुळे रोहित पवारांची ही पोस्ट केवळ एका पुस्तकाचे कौतुक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्यातील भूमिकेची नांदी याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.

follow us