मोदींच्या उदयासाठी अण्णा आंदोलनाची पायाभरणी? सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्याने नवा वाद
अण्णा हजारे यांच्या देशभर गाजलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला भाजप आणि आरएसएसचा पाठिंबा असल्याचा दावा सोनिया गांधींनी केला आहे.
Claim in Sonia Gandhi’s book sparks a new controversy : 2012 मध्ये देशभर गाजलेल्या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाबाबत आता एक मोठा दावा समोर आला आहे. हे आंदोलन केवळ भ्रष्टाचाराविरोधातील जनआंदोलन नव्हते, तर त्यामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणजेच आरएसएसचा पाठिंबा आणि नियोजन होते, असा दावा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या नव्या पुस्तकात केल्याचे समोर आले आहे. या दाव्यामुळे तत्कालीन युपीए सरकारविरोधात झालेल्या आंदोलनची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकातील उल्लेखानुसार, व्यापक अधिकार असलेले लोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांना दिल्लीत आणण्यात आले होते. त्यांच्या उपोषणाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नागरिक रस्त्यावर उतरले आणि तत्कालीन युपीए सरकारविरोधात वातावरण तापले. या आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. त्यातच भाजपने देखील सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने युपीए सरकार राजकीयदृष्ट्या अडचणीत आले.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या आंदोलनामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींनी नंतर हे आंदोलन भाजप आणि संघाच्या पाठिंब्याने आयोजित करण्यात आल्याची कबुली दिल्याचं देखील पुस्तकात नमूद असल्याचा दावा केला जात आहे. या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा असलेल्या लोकपाल विधेयकाबाबत देखील सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे.
2014 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्तांची व्यवस्था करण्यात आली. सार्वजनिक पदांवरील व्यक्तींविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी ही यंत्रणा निर्माण करण्यात आली. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर ही व्यवस्था प्रभावीपणे काम करू शकली नाही, अशी टीका देखील पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तसेच, सरकारविरोधातील आंदोलनाचा राजकीय उद्देश सध्या झाल्यानंतर अण्णा हजारे आणि त्या आंदोलनाची चर्चा हळूहळू कमी झाली, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या काळात आरएसएस पडद्यामागे नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवर पुढे आणण्याची तयारी करत असल्याचा देखील उल्लेख पुस्तकात असल्याचा सांगितलं जात आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. संघाच्या विचारसरणीत वाढलेले आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे मोदी यांची मुख्यमंत्री म्हणून खंबीर आणि उद्योगस्नेही नेते अशी प्रतिमा तयार झाली होती. त्यांच्या आक्रमक प्रचारामुळे ते राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या त्या पत्रानंतर सोनिया गांधी यांच्या डोळ्यात अश्रू, ‘बिलॉन्गिंग’मधून मोठा खुलासा
एकूणच, अण्णा हजारेंचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, भाजप आणि आरएसएसची कथित भूमिका, तत्कालीन युपीए सरकारवरील दबाव आणि नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयाची पार्श्वभूमी, या सर्व मुद्द्यांवर सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, हे आंदोलन भाजप आणि आरएसएस पुरस्कृत असल्याचा हा पुस्तकातील दावा आहे.