Nvidia CEO Divorce : अब्जाधीशांचा संसार मोडला तर, किती मोजावी लागते किंमत? वाचा चर्चेतले Divorce

World's Most Expensive Divorces अब्जाधीशांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला तर त्याची आर्थिक किंमतही तितकीच मोठी असू शकते.

  • Ninad K
  • Written By: Published:
World's Most Expensive Divorces 

World’s Most Expensive Divorces : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीचे आकडे ऐकून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतात. मात्र, याच अब्जाधीशांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला तर त्याची आर्थिक किंमतही तितकीच मोठी असू शकते. त्यात सध्या जगातील आघाडीची चिपनिर्मिती कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग आणि त्यांच्या पत्नी लोरी हुआंग यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जेन्सन यांनी एका चायनीज महिलेसोबत अफेयरबाबत केलेल्या विधानानंतर हा विषय वाऱ्यासारखा पसरला आहे. मात्र, अद्याप हुआंग किंवा त्यांच्या पत्नी लोरी हुआंग दाम्पत्याने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा कोणतीही घटस्फोट याचिका दाखल झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर जगातील काही सर्वात महागड्या घटस्फोटांचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…

जगातले महागडे घटस्फोट कोणते?

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स (2021):  मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा 27 वर्षांचा संसार 2021 मध्ये संपुष्टात आला. घटस्फोटानंतर मेलिंडा यांना मिळालेल्या मालमत्ता हस्तांतरणाचे मूल्य सुमारे 76 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते.

जेफ बेझोस आणि मॅकेन्झी बेझोस (2019): अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या घटस्फोटाने वर्ष 2019 साली जगभरात मोठी चर्चा घडवली. मॅकेन्झी बेझोस यांना अॅमेझॉनमधील सुमारे 4 टक्के हिस्सा मिळाला. त्यावेळी त्याचे मूल्य जवळपास 38 अब्ज डॉलर होते.

अलेक आणि जोसेलिन वाइल्डनस्टीन (1999): अलेक आणि जोसेलिन वाइल्डनस्टीन यांचा घटस्फोट 1999 मध्ये अंतिम झाला. सुमारे दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर त्यांचा 21 वर्षांचा संसार संपुष्टात आला. अब्जाधीश अलेक वाइल्डनस्टीन यांच्या घटस्फोटात जोसेलिन यांना सुमारे 2.5 अब्ज डॉलर आणि पुढील 13 वर्षांसाठी वार्षिक 100 दशलक्ष डॉलर देण्याचा निर्णय झाला होता. या घटस्फोटाची एकूण रक्कम सुमारे 3.8 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते.

रुपर्ट मर्डोक आणि अॅना टॉर्व्ह (1999) : मीडिया क्षेत्रातील दिग्गज रुपर्ट मर्डोक आणि अॅना यांचा सुमारे 31 वर्षांचा संसार 1999 संपुष्टात आला. या घटस्फोटात अॅना यांना जवळपास 1.7 अब्ज डॉलर किमतीची मालमत्ता आणि समभाग मिळाल्याचे सांगितले जाते.

बर्नी एक्लेस्टोन आणि स्लाविका (2009) :  फॉर्म्युला वनचे माजी प्रमुख बर्नी एक्लेस्टोन यांच्या घटस्फोटात पत्नी स्लाविका यांना जवळपास 1.2 अब्ज डॉलर मिळाल्याचा अंदाज आहे. बर्नी एक्लेस्टोन आणि स्लाविका यांचा घटस्फोट 11 मार्च 2009 रोजी झाला. हा जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो, ज्यामध्ये स्लाविका यांना सुमारे 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 740 दशलक्ष पाउंड मिळाले होते. 

स्टीव्ह आणि इलेन विन (2009) :  कॅसिनो आणि हॉटेल व्यवसायातील दिग्गज स्टीव्ह विन आणि इलेन विन यांच्या घटस्फोटातील मालमत्ता वाटपाचा आकडा जवळपास एक अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते.

हॅरोल्ड हॅम आणि स्यू अॅन अर्नॉल (2012) : अमेरिकेतील तेल उद्योगातील अब्जाधीश हॅरोल्ड हॅम यांच्या घटस्फोटात जवळपास ९७५ दशलक्ष डॉलरची तडजोड झाली होती. हा देखील जगातील महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो.

दिमित्री रिबोलोवलेव आणि एलेना रिबोलोवलेव (2014) : रशियातील अब्जाधीश उद्योजक दिमित्री रिबोलोवलेव आणि त्यांची पत्नी एलेना यांचा घटस्फोट जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो. या घटस्फोटात एलेना यांना सुमारे 30,134 कोटी रुपयांची मालमत्ता मिळाल्याचा उल्लेख केला जातो. मालमत्तेच्या वाटपावरून हा घटस्फोट अनेक वर्षे चर्चेत राहिला.

टायगर वुड्स आणि एलिन नॉर्डेग्रेन (2010) : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स आणि त्यांची पत्नी एलिन नॉर्डेग्रेन यांचा घटस्फोटही प्रचंड महागडा ठरला. विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणानंतर दोघांचा संसार संपुष्टात आला. घटस्फोटाच्या समझोत्यानुसार एलिन यांना सुमारे 637 कोटी रुपयांची रक्कम मिळाल्याचे सांगितले जाते.

मॅडोना आणि गाय रिची (2008) : पॉप संगीतविश्वातील प्रसिद्ध गायिका मॅडोना आणि ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक गाय रिची यांचा आठ वर्षांचा संसार २००८ मध्ये संपुष्टात आला. या घटस्फोटात गाय रिची यांना सुमारे 618 कोटी रुपयांची मालमत्ता मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मनोरंजनविश्वातील हा घटस्फोट त्यावेळी विशेष चर्चेत होता.

अदनान खाशोगी आणि सोराया खाशोगी (1974) : सौदी अरेबियातील प्रसिद्ध शस्त्रव्यापारी आणि उद्योजक अदनान खाशोगी यांच्या घटस्फोटाने त्या काळात मोठे लक्ष वेधले होते. पत्नी सोराया यांच्यासोबतच्या घटस्फोटात सुमारे 5,852 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे वाटप झाल्याचे सांगितले जाते. त्या काळातील प्रचंड संपत्तीच्या व्यवहारांपैकी हा एक महत्त्वाचा व्यवहार मानला जातो.

मायकेल जॉर्डन आणि जुआनिता व्हॅनॉय (2006) : बास्केटबॉलमधील दिग्गज खेळाडू मायकेल जॉर्डन आणि त्यांची पत्नी जुआनिता व्हॅनॉय यांचा 17 वर्षांचा संसार 2006 मध्ये संपला. या घटस्फोटात जुआनिता यांना सुमारे 1,130 कोटी रुपयांची मालमत्ता मिळाल्याचे वृत्त आहे. क्रीडाविश्वातील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या घटस्फोटांमध्ये या प्रकरणाचा समावेश होतो.

अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि मारिया श्रायव्हर (2011) : हॉलिवूड अभिनेता आणि कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि पत्रकार मारिया श्रायव्हर यांचा 25 वर्षांचा संसार 2011 मध्ये संपुष्टात आला. विवाहबाह्य संबंधातून झालेल्या वादानंतर मारिया यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या घटस्फोटातील संभाव्य मालमत्ता वाटपाचे मूल्य सुमारे 900 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

अँडी बायर्न यांचे प्रकरणही चर्चेत

कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमधील ‘किस कॅम’ व्हिडिओमुळे अँडी बायर्न जगभर चर्चेत आले होते. कंपनीतील वरिष्ठ अधिकारी क्रिस्टिन कॅबॉट यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक दावे केले गेले. या घटनेनंतर त्यांची पत्नी मेगन केरिगन बायर्न यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, तो दावा त्यांच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आलेला नव्हता. उपलब्ध वृत्तांनुसार, त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत नोंदही सार्वजनिकरीत्या समोर आलेली नाही. मात्र एखाद्या वैयक्तिक वादाचा व्यावसायिक प्रतिमेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो, याचे हे उदाहरण ठरले.

बिल गेट्स, जेफ बेझोस, रुपर्ट मर्डोक यांच्यापासून ते जेन्सन हुआंग यांच्यापर्यंतच्या प्रकरणांतून एक गोष्ट स्पष्ट होते. अब्जाधीशांच्या घटस्फोटात केवळ वैयक्तिक नातेसंबंधांचा प्रश्न नसतो, तर कंपनीतील हिस्सेदारी, कौटुंबिक ट्रस्ट, मालमत्तेचे अधिकार आणि कायदेशीर करार यांचाही मोठा वाटा असतो. जेन्सन हुआंग यांच्या बाबतीत प्रत्यक्ष घटस्फोट होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या चर्चेमुळे जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

follow us