बीडमध्ये खाद्यतेलाविरोधात एफडीएची मोठी कारवाई; 1.94 कोटींचे तेल जप्त, पाच परवाने निलंबित
आयुक्त श्रीकांत करकाळे आणि सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत (FDA) अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात खाद्यतेलाचा पुनर्प्रक्रिया व साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर मोठी कारवाई केली. 6 आणि 7 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत ₹1,94,50,922 किमतीचे तब्बल 1,19,187.5 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करून संबंधित युनिट बंद करण्यात आले. आयुक्त श्रीकांत करकाळे आणि सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बीड येथील एमआयडीसी परिसरातील स्वागत ऑइल इंडस्ट्रीज येथे मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. एकाच टाकीतून सोयाबीन तेलाची ‘रिफाइंड’ आणि ‘अल्ट्रा रिफाइंड’ अशा वेगवेगळ्या नावाने दिशाभूल करणारी पॅकिंग केली जात असल्याचे आढळले. तसेच वापरलेले डबे पुन्हा वापरणे, अस्वच्छ परिसर, अंतर्गत प्रयोगशाळेचा अभाव, विश्लेषण प्रमाणपत्र नसणे, अन्नपदार्थासाठी आवश्यक प्रमाणपत्रांचा अभाव तसेच वैद्यकीय तपासणी व कीटकनियंत्रणाच्या नोंदी नसल्याचे निदर्शनास आले. येथून ₹1,05,85,236 किमतीचे 66,652.6 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.
एफडीएची बीडमध्ये छापा! बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त; कोटींच्या व्यवहाराची पोलखोल
त्यानंतर बीड एमआयडीसीतील चर्खा ऑइल मिलवरही कारवाई करण्यात आली. पामोलीन तेलाची दिशाभूल करणारी पॅकिंग, वापरलेले डबे, अस्वच्छता तसेच प्रयोगशाळा, विश्लेषण प्रमाणपत्र आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळला. या कारवाईत ₹78,22,050 किमतीचे 45,995.7 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.
वडवणी येथील जय हनुमान ट्रेडर्स येथेही वापरलेले डबे, अस्वच्छ वातावरण, आवश्यक प्रमाणपत्रे व नोंदींचा अभाव आणि तेलाच्या टाक्यांवर चुकीचे लेबलिंग आढळले. येथून ₹7,24,596 किमतीचे 4,545.2 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. माजलगावच्या जुना मोंढा परिसरातील जान्हवी कमर्शियल्स येथे विनालेबल सैल खाद्यतेल असुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. बॅच क्रमांक, विश्लेषण प्रमाणपत्र आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने ₹2,79,360 किमतीचे 1,746 किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले.
याच परिसरातील विनायक ऑइल इंडस्ट्रीज येथेही सैल तेलाची असुरक्षित साठवणूक, वापरलेल्या डब्यांचा वापर आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळला. येथून ₹39,680 किमतीचे 248 किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. या 5 आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करून युनिट बंद करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान एकूण 27 अंमलबजावणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना खाद्यतेल खरेदी करताना केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच तेल खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. पॅकेटवरील FSSAI परवाना क्रमांक, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख आणि योग्य लेबलिंग तपासूनच खाद्यतेल खरेदी करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यभर अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.