पवनचक्कीच्या वाहनांसाठी शेकडो झाडांचा बळी; नेकनूरमधील वृक्षतोडीने संताप
Beed Tree Cutting : लाखो रुपये खर्चून वाढवलेली झाडे काही क्षणांत हटवण्यात आल्याने नेकनूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Beed Tree Cutting : बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत (Beed) असताना नेकनूर परिसरात शासकीय निधीतून लावलेली शेकडो झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गारपीर माथा ते चाकरवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 2014-2015 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षलागवड करण्यात आली होती. या कामासाठी शासनाने सुमारे 23 लाख रुपये खर्च केले होते. मात्र, पवनचक्की उभारणीसाठी येणाऱ्या अवजड वाहनांना रस्ता अपुरा पडत असल्याने ही झाडे उखडून टाकण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
नेकनूरमधील गारपीर माथा ते चाकरवाडी मार्गावरून पवनचक्की कंपनीची अवजड वाहने आणि साहित्याची वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीसाठी रस्ता मोठा करण्याची गरज असल्याचे सांगत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे हटवण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेक वर्षे जोपासल्यानंतर ही झाडे मोठी झाली होती. त्यामुळे परिसरातील हिरवळ वाढण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही त्यांची मदत होत होती. मात्र, वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासाठी झाडेच काढून टाकल्याने कंपनीच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कुणी झाडं तोडायला आले तर, कोरोनात केलं तसं थाळ्या-वाट्या वाजवून हाकलून लावा : सयाजी शिंदे
एकीकडे शासनाकडून वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी विविध योजना राबवल्या जातात, तर दुसरीकडे शासकीय निधीतून लावलेली झाडे खासगी प्रकल्पाच्या सोयीसाठी तोडली जात असल्याचा आरोप होत आहे. बीड जिल्ह्यात पाण्याची टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती असताना झाडांचे संवर्धन करण्याची गरज अधिक आहे. अशा वेळी शेकडो झाडे तोडण्याची परवानगी कोणी दिली, संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष का केले, असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
या प्रकाराबाबत वृक्षप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित कंपनीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रामनाथ घोडके यांनी केली आहे. शासकीय निधीतून उभारलेल्या वृक्षसंपदेची अशा प्रकारे नासधूस होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वृक्षतोडीसाठी परवानगी घेतली होती का आणि झाडे हटवण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने घेण्यात आला, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणीही परिसरातून होत आहे.